Disha Shakti

कृषी विषयी

राहुरी कृषि विद्यापीठातील चारा पिके प्रकल्पातील संशोधन विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक – ॲड.निलेश हेलोंडे पाटील

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी कृषि विद्यापीठातील चारा व गवत पिके प्रकल्पातील विविध पिकांवर झालेल्या संशोधनाचा विदर्भ व मराठवाड्यातील पडीक जमिनीवर अवलंब केल्यास तेथील शेतकऱ्यांना वर्षभर हिरवा चारा उपलब्ध होऊ शकेल. त्याला दूध धंद्याची जोड दिल्यास तेथील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळेल. त्यामुळे विदर्भ व मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देता येईल. या विद्यापीठात होत असलेले संशोधन विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन अमरावती येथील कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष मा. अँड. श्री.निलेश हेलोंडे पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्पास व गवत संशोधन प्रकल्पास मा. ॲड. श्री.निलेश हेलोंडे पाटील यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख तथा वरिष्ठ ज्वारी पैदासकार डॉ. विजू आमोलिक, चारा पैदासकार डॉ. लक्ष्मण तागड, चारा पिके प्रकल्पाचे कनिष्ठ कीटकशास्त्रज्ञ डॉ. संदीप लांडगे, अहमदनगरचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे, अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक श्री. अतुल बुटे व राहुरीचे कृषि अधिकारी श्री. अशोक गिरगुणे उपस्थित होते.

यावेळी अँड. श्री.निलेश हेलोंडे पाटील यांनी प्रक्षेत्र भेटीदरम्यान प्रत्येक चारा व गवत पिकांची माहिती घेतली. या चारा पिकांमध्ये मका, चवळी, लसुन घास आणि गवत पिकांमध्ये नेपियरचे विविध वाण, स्टायलो, दशरथ घास, मारवेल, पवना गवत, डोंगरी गवत, मद्रास अंजन यांचा समावेश होता. या सर्व चारा व गवत पिकांचा विदर्भ व मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यात प्रसार कसा करता येईल याविषयी त्यांनी शास्त्रज्ञांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी काटे विरहित निवडुंग, त्याचे पौष्टिक मूल्य तसेच आहारातील समावेश याची माहिती जाणून घेतल्यानंतर विदर्भ तसेच मराठवाड्यातील पडीक जमिनीवर लागवड करण्याचा मनोदय व्यक्त केला. यानंतर त्यांनी अखिल भारतीय समन्वित संगमनेरी शेळी संशोधन प्रकल्पास भेट दिली. याप्रसंगी प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. विष्णू नरवडे यांनी संगमनेरी क्षेत्रीय युनिट विषयी तसेच प्रकल्पावर उभारलेल्या गोट गॅलरी याद्वारे शेळ्यांचे आहार व्यवस्थापन तसेच शेळ्यांचे वर्षभर चाऱ्याचे नियोजन, जंतांमुळे होणारे आजार व शेळीपालन प्रकल्प अहवालाविषयी विस्तृत माहिती दिली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. विठ्ठल शिर्के यांनी चारा व गवत पिकांचे पौष्टिक मूल्य याविषयी माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील संशोधन प्रकल्पांमध्ये शेतकरीभिमुख संशोधनाचे कार्य चालू आहे. डॉ. विजू अमोलिक यांनी विविध चारा व गवत पिकांचे महत्त्व विषद करून त्यांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी सखोल माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मण तागड यांनी केले.

या चारा पिके प्रकल्प तसेच गवत संशोधन योजना येथील भेटीच्या नियोजनासाठी या प्रकल्पातील श्री. अजित हरिश्चंद्र, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. दीपक पालवे, कृषि सहाय्यक श्री. संदीप ढगे, श्री.नवनाथ धामोरे, श्री. सुहास भालेराव, श्रीमती शैला दरवडे, श्रीमती मंगल आंधळे, श्री. अशोक शेटे, श्री. संजय बोरुडे, श्री. समर्थ दुबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.


Spread the love
error: Content is protected !!