विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : जमीन नावावर करून देत नाही म्हणून व्यसनाधीन झालेल्या मुलाने वृध्द पित्याचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खुन केल्याची घटना राहाता तालुक्यातील कोर्हाळे येथे घडली. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात आरोपी अनिल गणपत कोळगे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्हाळे जाधव वस्ती येथे कोळगे कुटुंबीय राहत असून गणपत संभाजी कोळगे (वय 80) हे आपल्या मुलगा, सून, नातवंडा सोबत राहत होते. त्यांचा मुलगा अनिल कोळगे हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला होता. तो नेहमी वडिलांकडे त्यांच्या नावे असलेली जमीन स्वतःच्या नावे करण्याची मागणी करत असे.
यामुळे दोघांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा वाद झालेला होता. परंतु वडील जमीन नावावर करण्यास तयार नव्हते. याचाच राग मनात धरून आरोपीने सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वडील गणपत कोळगे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून त्यांची हत्या केली.वडील मयत झाल्याचे पाहून आरोपी पसार झाला. मयत गणपत कोळगे यांचा नातू अमोल विश्वनाथ साळवे रा. कोल्हेवाडी तालुका संगमनेर यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिस ठाण्यात गुन्हा गुन्हा नंबर 300/241 भादवि कलम 302 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोपानराव काकड करत आहे
Leave a reply