Disha Shakti

क्राईम

मनपा आयुक्त डॉ.जावळेंनी मागितली आठ लाखाची लाच, लाचलुचपत विभागाची कारवाई, स्विय सहाय्यकही जाळ्यात

Spread the love

अ.नगर प्रतिनिधी / इनायत अत्तार : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जालना येथील पथकाने अहमदनगर महापालिकेत मोठी कारवाई केली. बांधकाम परवानगी देण्यासाठी व्यावसायिकाकडे आयुक्त तथा प्रशासक डॉ. पंकज जावळे यांचे स्विय सहायक श्रीधर देशपांडे यांनी आठ लाख रूपयांची मागणी केली. डॉ. जावळे यांनी लाच मागणी करण्यासाठी देशपांडे यांना प्रोत्साहन दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोघांविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आयुक्त डॉ. जावळे यांच्यासह त्यांच्या स्विय सहायकाविरूध्द लाचेची कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. जावळे यांचे दालन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (गुरूवारी) दुपारी दोनच्या सुमारास सील केले. त्यांच्या शासकीय निवासस्थानाला देखील टाळे लागले आहे.

तक्रारदार हे बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर त्यांना भागीदारांसह बांधकाम करायचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालयाकडे 18 मार्च 2024 रोजी ऑनलाईन अर्ज केला होता. सदर परवानगीसाठी आयुक्त डॉ. जावळे हे स्विय सहायक देशपांडे याच्या मार्फत नऊ लाख 30 हजार रूपये लाचेची मागणी करत असल्याची तक्रार तक्रारदार यांनी जालना येथील लाचलुचपत विभगाकडे केली होती.

या तक्रारीवरून लाचलुचपत विभगाने 19 व 20 जून 2024 रोजी पडताळणी केली असता देशपांडे याने तक्रारदार यांच्याकडे आयुक्त डॉ.जावळे  यांच्याकडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी आठ लाख रूपये लाचेची मागणी पंचासमक्ष केली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आयुक्त डॉ. जावळे हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!