अ.नगर प्रतिनिधी / इनायत अत्तार : शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील पांगरमल शिवारात गुरूवारी मध्यरात्री घडली. चांगदेव नामदेव चव्हाण (वय 25 रा. पखोरा, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) असे मयत तरूणाचे नाव आहे. मारहाणीत एका महिलेसह तिघे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पांगरमलचे सरपंच अमोल आव्हाडसह सहा व इतर अनोळखी 20 ते 25 जणांविरूध्द खून, विनयभंग, अॅट्रोसिटी आदी कलमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरपंच अमोल आव्हाड, महादेव आव्हाड (पूर्ण नाव नाही), उध्दव महादेव आव्हाड, आजीनाथ महादेव आव्हाड, गणेश अंबादास आव्हाड, संदीप पंढरीनाथ आव्हाड (सर्व रा. पांगरमल) व गावातील इतर अनोळखी 20 ते 25 जणांविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
30 वर्षीय फिर्यादी महिला नगर तालुक्यातील एका गावातील रहिवाशी असून तिच्या मुलासह चांगदेव चव्हाण व प्रवीण भोसले गुरूवारी मध्यरात्री साडेबारा ते दीड वाजेच्या दरम्यान पांगरमल गावात असताना गावचा सरपंच अमोल आव्हाड व इतरांनी हातात कुर्हाडी, कोयते व लाकडी दांडके घेऊन फिर्यादी महिला, तिचा मुलगा, चांगदेव व प्रवीण यांना शेळ्या चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी महिलेसह तिचा मुलगा व प्रवीण जखमी झाले तर चांगदेव यांचा मृत्यू झाला. उध्दव आव्हाड व एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीसोबत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. जातीवाचक शिवीगाळ करून जिवंत ठार मारण्याची धमकी दिली. जमावाने जिल्हाधिकारी यांनी लागू केलेल्या जमावबंदीचे उल्लंघन करून दुचाकीचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
चौघे पोलिसांच्या ताब्यात दरम्यान, चोरीच्या संशयावरून चौघांना पकडून मारहाण केल्याची माहिती गावातीलच व्यक्तीने एमआयडीसी पोलिसांना दिली. पांढरीपुल परिसरात रात्र गस्तीवर असलेले एमआयडीसी पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मारहाणीत जखमी झालेल्या चौघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चांगदेव चव्हाण यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केले. पोलिसांनी रात्रीतून चौघांना ताब्यात घेतले आहे. महादेव आव्हाड, उध्दव आव्हाड, गणेश आव्हाड व संदीप आव्हाड अशी ताब्यात घेतलेल्या चौघांची नावे आहेत. इतर संशयित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
पांगरमलमध्ये जमावाच्या मारहाणीत तरूणाचा मृत्यू, सरपंचासह 20 ते 25 जणांविरूध्द गुन्हा दाखल

0Share
Leave a reply