विशेष प्रतिनिधी अ.नगर / वसंत रांधवण : लोकसभा निवडणुकीनंतर आता काही महिन्यांवर येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडी टिकेल का ? महायुती अबाधित राहील का ? असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात उपस्थित केले जात आहेत. महायुती आणि महाविकास या दोन्ही आघाड्या भक्कम राहिल्यास येती विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीपेक्षा अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. दोन्ही आघाड्यांतील मित्रपक्षांनी निवडणुकीवेळी वेगळा पवित्रा घेतला तर मात्र उमेदवारांच्या साठमारीत महाराष्ट्र विधानसभेत त्रिशंकू चित्र दिसू शकते, असेही म्हटले जात आहे.
लोकसभा निवडणूकीतील यशाने महाविकास आघाडीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तशातच लोकसभा निवडणुकीनंतर आलेल्या जनमत चाचणीच्या अंदाजानुसार येत्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे पारडे जड भरण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीला १५८ तर महायुतीला १२७ जागा मिळण्याचे भाकित ताज्या जनमत चाचणीत व्यक्त करण्यात आले आहे. महाविकास आघाडीला लोकसभेत मिळालेले यश पहाता आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवू इच्छीत असणाऱ्यांची संख्या वाढणार यात शंका नाही. मात्र प्रतेक मतदारसंघात एकापेक्षा अधिक इच्छुक पुढे येऊ शकतात. त्या सर्वांची मनधरणी करताना आघाडीच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. महायुतीपुढेही अनेक इच्छुकांचे आवाहन पुढे ठाकणार आहे.
लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३१ जागा मिळाल्या तरी मिळालेल्या मतांचे प्रमाण ४३.९ टक्के आहे. तर महायुतीच्या मतांचा टक्का ४३.६ टक्के आहे. महाविकास आघाडीला २ कोटी ५० लाख तर महायुतीला २ कोटी ४८ लाख मते मिळाली आहेत. दोन्ही आघाड्यांच्या मत टक्केवारीत अवघ्या दोन लाख मतांचा फरक आहे. तो पाहता लोकसभा निवडणुकीतील चुकांपासून धडा घेऊन त्या सुधारण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाऊ शकतो.
लोकसभा निवडणूकीतील यशाने महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात यशाची हवा गेली नाही, ते संयमाने राहिले, लोकसभातही महाविकास आघाडी एकत्र राहिली, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम केले, तर तिन्ही पक्षांची मते त्या – त्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळाली, सर्वांनी एकमेकांचा सन्मान ठेवला तर विधानसभेतही चांगली कामगिरी करण्याची संधी महाविकास आघाडीला मिळू शकते. मात्र महाविकास आघाडीत मतभेद उफळले तर त्याचा फायदा भाजप उचलल्याशिवाय राहणार नाही.
आजच्या स्थितीत असलेल्या महाराष्ट्रातील दोन्ही आघाड्यांत काहीही फेरबदल झाले तरी त्याचा परिणाम थेट विधानसभा निवडणुकीवर होऊ शकेल. निवडणूक अटीतटीची होईल.भाजप अधिक सावध होईल. विरोधकांचे खरे की खोटे नरेटिव्ह जनतेत जाऊन उगडे पाडण्याचा प्रयत्न करेल. लोकसभा निवडणूक प्रचारात महिविकास, इंडिया आघाडीने दलित, आदिवासी समाजाची मते मिळवली. त्यामुळे त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते आगामी काळात समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचा आटोकाट प्रयत्न करतील. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात भाजपचे ४८ नेते भेट देऊन जनतेच्या मनातील गैरसमज दूर करतील. नवमतदार नोंदणी अभियानही हाती घेतले जाईल. संकल्पपत्रातील प्रत्येक आश्वासनाच्या पूर्तीसाठी महायुती आणि भाजप नेतृत्वातील एनडीए सरकार वचनबद्ध आहे. हा विश्वास जनतेला देण्यासाठी भाजपाचा प्रत्येक नेता, मंत्री, पदाधिकारी व कार्यकर्ते पुढील काळात मरगळ झटकून कामाला लागतील. एकूणच महाविकास आघाडीचे नेते म्हणतात त्याप्रमाणे लोकसभा निवडणूक हा
` ट्रेलर ‘ होता तो ` चित्र ‘ पट महाराष्ट्रात विधानसभेला दिसेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत आत्तापासूनच सर्वांना उत्सुकता लागणे सहाजिकच आहे.
लोकसभेच्या ` ट्रेलर ‘ ने विधानसभेचा` चित्र ‘पट बदलणार सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडी भिडणार

0Share
Leave a reply