नांदगाव प्रतिनिधी / खंडू कोळेकर : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या लाभाची अफरातफर करून तीन लाख ५७ हजार ७५० रुपयांच्या अपहार प्रकरणी नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे.
नांदगाव तालुक्यामध्ये नोव्हेंबर २०२३ या महिन्यात झालेल्या गारिपटीमध्ये अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्याबाबत राज्य शासनाने त्यांना ठरावीक अनुदान मदत म्हणून दिले होते. नांदगाव तालुक्यातील मांडवड गावचा ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी १३ फेब्रुवारी ते २२ मार्च या काळात अनेक शेतकऱ्यांचा निधी सातत्याने स्वत:च्या बँक खात्यातच वर्ग करत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नांदगाव गटविकास अधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तहसीलदारांना पत्रव्यवहार केला. त्या अनुषंगाने मंडळ अधिकाऱ्यांनी त्याविरोधात नांदगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागासह मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याच्या निलंबनाचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार सर्व बाबी तपासून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मांडवड ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणामध्ये संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यापुढे त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. त्यामध्ये आलेल्या मुद्द्यांना अनुसरून त्याच्यावर विभागीय चौकशी प्रस्तावित केली जाणार आहे.
– आशिमा मित्तल, सीईओ, जिल्हा परिषद, नाशिक
नांदगाव तालुक्यातील मांडवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण साडेतीन लाखांच्या अपहार प्रकरणी निलंबित

0Share
Leave a reply