पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेनंतर विधान परिषद निवडणुकीत यश मिळाल्यानंतर ठाकरे गटाचा आत्मविश्वास दुपटीने वाढल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या वसंत मोरे यांनीही ठाकरे गटात घरवापसी केली. यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी साजन पाचपुते आणि राणी लंके विधानसभेत जातील, असे सांगत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या उमेदवारीची घोषणाच केली.
शनिवारी १३ जुलै रोजी श्रीगोंदा येथे ठाकरे गटाचे उपनेते साजन पाचपुते यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा यांच्यावर टीका करताना आगामी विधानसभा निवडणुकांबाबत थेट भाष्य केले. शिवसेनेला आणि शिवसैनिकांना चांगले दिवस आले. लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यामुळे आता विधानसभेत हीच जादू चालणार आहे.शिवसेना उपनेते साजन पाचपुते आणि खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या विधानसभेत जातील, अशी घोषणा संजय राऊतांनी केली.
नगर जिल्ह्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही आमदार नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षाने या विधानसभेला नगर जिल्ह्यात खाते उघडण्याची तयारी सुरू केली आहे. खासदार संजय राऊत यांचे नगर जिल्ह्यात हर एक कारणाने दौरे वाढलेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राऊत यांचे झालेल्या दौऱ्यावर त्यांचा नगर दक्षिण आणि उत्तर लोकसभा मतदारसंघाचा चांगला अभ्यास केलाय. शिवसेना ठाकरे पक्षाकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. परंतु विजयी उमेदवार हाच शेवटचा निकष ठेवून महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष चाचपणी करत आहे. विधानसभा निवडणूक लढवायच्या अप्रत्यक्षपणे सूचना केल्यात. मात्र राणीताई लंके कोणत्या पक्षाकडून लढणार हे अजून ठरलेले नाही.
श्रीगोंदा येथील सभेत खासदार संजय राऊत यांनी नीलेश लंके यांनी लोकसभेत इंग्रजीतून घेतलेल्या शपथेचा उल्लेख केला निलेश लंके यांनी इंग्रजीमध्ये शपथ घेतली असून विधानसभेत तुम्ही कोणत्या भाषेत शपथ घेणार,असे निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके यांना विचारणा केली असता सभेत एकच हशा पिकला. खासदार राऊत यांनी राणीताई लंके यांच्या माध्यमातून पारनेर विधानसभा मतदारसंघावर दावा केल्याचे दिसते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांच्या राजकीय भुवया उंचावल्यात.
निलेश लंके पूर्वाश्रमीचे शिवसैनिक. त्यामुळे त्यांची शिवसेनेशी असलेली नाळ अजूनही कायम दिसते. विधानसभा निवडणुकीत त्यांची नगर जिल्ह्यात महत्त्वाची भूमिका असणार आहे. खासदार संजय राऊत यांनी राणी लंके यांच्या उमेदवारीबाबत केलेल्या विधान हसण्यावारी घेता येणार नाही. त्यामुळे पारनेरबाबत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात नक्कीच काहीतरी शिजत आहे, अशी चर्चा पारनेर मतदारसंघात सुरू आहे.
Leave a reply