सोलापूर जिल्हा प्रतिनिधी / नागनाथ पाटील : मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित,श्री मल्लिकार्जुन बालक मंदिर,श्री सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळा,श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तुरे कनिष्ठ महाविद्यालय,हत्तुरे नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी वारी निमित्त विद्यार्थी बाल दिंडीचे आयोजन भक्तिमय वातावरणात करण्यात आले होते. प्रारंभी प्राचार्य वैजिनाथ हत्तुरे, संस्थेचे अध्यक्ष सिद्धप्पा वरनाळ, धरेप्पा हत्तुरे व प्राथमिकचे मुख्याध्यापक सचिन जाधव व पर्यवेक्षक रमेश दिंडोरे यांच्या शुभहस्ते पालखीचे पूजन करुन दिंडी मार्गस्थ झाली.
हातात भगवा पताका घेऊन बाल वारकरी,त्यामागे टाळकरी व पताकाधारी, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थी त्यांच्यामागे साड्या परिधान करून डोईवर तुळशी वृंदावन व विठ्ठल रखुमाईची मूर्ती घेऊन चालणाऱ्या विद्यार्थिनी त्यांना शिस्तीत घेऊन जाणारे शिक्षक वृंद आणि मुखी हरी नामाचा गजर करत ही बाल दिंडी नगरातून मार्गक्रमण करत प्रशालेच्या मैदानात आली.जवळपास चार तास चाललेल्या या दिंडीने नगरातील संपूर्ण वातावरण भक्तीरसाने भरून गेले होते.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात हा बालदिंडी सोहळा रंगला.विठ्ठल-रुक्माई, संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम, संत नामदेव,संत एकनाथ,संत जनाबाई,संत मुक्ताबाई व अन्य संतांच्या वेशभूषेत विद्यार्थी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. बाकीचे विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशभूषेत उपस्थित होते.तब्बल 2500 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी पूजन करुन स्वागत केले व विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभाग नोंदवला.शेवटी प्रशालेच्या प्रांगणात ग्यानबा-तुकाराम च्या गजरात डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदीपक गोल रिंगण सोहळा,श्रद्धा व शिस्तीचे अनुपम दर्शन घडवणारा सोहळा पार पडला.या दिंडीमध्ये विशेष करून ढोल पथकातील वारकरी, फुगडीचा खेळ खेळणाऱ्या मुलींनी सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. जागोजागी रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या व त्यामधून पर्यावरण विषयक व सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला होता.शेवटी प्रशालेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांसाठी व भक्तासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या दिंडीमध्ये भारती विद्यापीठचे प्राचार्य डॉ.कीर्ती राज सर,ॲड.नागेश पाटील,बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका संगीता हुमनाबादकर,काशिनाथ मळेवाडी, सुधाकर कामशेट्टी,मारुती माने,बसवराज कोरे, सविता कुलकर्णी,अनिलकुमार गावडे, अनिता हौदे,सुकेशनी गंगौडा,प्रतीक्षा बिडवे,प्रिया पसारे व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक,प्राध्या.व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. हा दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी लक्ष्मीकांत पनशेट्टी,गणेश कोरे,संतोष स्वामी आदी शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेतले.
Leave a reply