नांदेड प्रतिनिधी / मिलिंद बच्छाव : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. हैदराबाद येथील किम्स रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
यकृतामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे वसंत चव्हाण यांना सुरुवातीला नांदेडमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वास घेण्यास अडचण येत होती. तसंच कमी रक्तदाबाचा त्रासही होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यानंतर चव्हाणांना एअर अॅम्ब्युलन्सने हैदराबादला नेण्यात आले होते. प्रत्येक महिन्याच्या १० तारखेला वसंतराव चव्हाण डायलसिस करत असत. पण नांदेडमध्ये आयोजित काँग्रेसच्या विभागीय बैठकीमुळे त्यांना नियमित आरोग्य चाचण्या करणे जमलं नव्हतं. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडल्याची माहिती आहे.
आगामी विधानसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची चाचपणी सुरू होती. त्यासाठी पक्षातील प्रमुख नेते महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नांदेड, हिंगोली आणि लातूर जिल्ह्यांची एकत्रित बैठक नांदेडमध्ये झाली होती. यंदा लोकसभा निवडणुकीत लातूर आणि नांदेडमध्ये काँग्रेस विजयी झाल्याने बैठकीत वेगळाच उत्साह दिसून येत होता. लातूरचे खासदार शिवाजीराव काळगे आणि नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण यांच्याकडे बैठकीचे नियोजन होते. या बैठकांमुळे वसंतरावांची धवपळ आणि दगदग झाली होती.
जाएंट किलर ठरलेले वसंतराव चव्हाण
लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर नांदेडमधील निवडणूक चर्चेत आली होती. काँग्रेसचा गड असलेल्या नांदेड मतदारसंघात २००४ च्या निवडणुकीत भाजपने शिरकाव केलेला होता. मात्र काँग्रेस उमेदवार वसंत चव्हाण यांनी भाजपचे तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पराभवाची धूळ चारत विजय खेचून आणला होता. ५९ हजार ४४२ मतांनी चव्हाणांनी चिखलीकरांवर मात केली. वसंतराव चव्हाण यांना ५,२८,८९४ तर चिखलीकरांना ४,६९,४५२ मतं मिळाली होती.
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास

0Share
Leave a reply