अकोले प्रतिनिधी / गंगासागर पोकळे : काल परवा टीव्हीवर गडचिरोली येथील एक व्हिडीओ दाखवला गेला एक बाप आणि आई आपल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर टाकून १५ किलोमीटर ची पायपीट करत आहे,अतिशय मन हेलावून टाकणारी घटना आहे ही आणि ही घटना घडतेय ती महासत्ता बनून पाहणाऱ्या आपल्या भारत देशात.
घटना बघितल्यानंतर असे लक्षात येतं की तेथील संपूर्ण व्यवस्थेचाच बोजबार वाजलेला आहे तेथे ना आरोग्य सेविका येते,ना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे,रस्त्यांची दुरावस्था सोडा तेथे रस्तेच नाही. त्या मुलांना ताप आला गावातील खाजगी वैद्याकडे उपचार घेतले पण गुण येत नाही म्हणून ते सरकारी सोडा खाजगी गाड्या सुद्धा तेथे नाही मग शेवटी पायपीट करत १५ किमी वरील प्राथमिक अयोग्य केंद्र गाठतात तेथे गेल्यावर दोन्ही मुलांना मृत घोषित करण्यात येतं.मृत घोषित केल्यानंतर सरकारी जबाबदारी संपते का?मग कशासाठी आहे १०२, १०८ ऍम्ब्युलन्स सर्विस? काही वेळ वाट पाहून माणुसकी शिल्लक नसलेल्या त्या ठिकाणाहून ते दोन माता पिता आपल्या लेकरांचे मृतदेह खांद्यावर टाकून डोळ्यात दुःखाचे अश्रू घेऊन,पावसाच्या रिपरिपीत,गाळ तुडवत,१५ किमी पायपीट करत गाव गाठतात आणि स्वतंत्र भारताचे भयाण वास्तव समोर येतं.जर ७८ वर्षानंतरही आपण मूलभूत सुविधा अशा ठिकाणी पोहचू शकलो नसेल तर खरंच आपण महासत्ता बनण्याच्या लायक आहोत का?हा प्रश्न प्रत्येक भारतीयांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.
शासन या बाबत सारवासारव करण्यासाठी सांगेल की तिथं नक्षली क्षेत्र आहे,जंगल क्षेत्र आहे त्यामुळं सुविधा पुरवण्यात अडचणी येतात मग माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की खरोखर या अडचणी आहे की राजकारण्याचं अपयश.७८ वर्षांचा हिशोब मागितल्यावर काहींना रागही येतो आणि वास्तव समोर आणून शायनिंग इंडिया बनवणाऱ्यांची शायनींग काढली तर कारवाई केली जाते,मग हा बदल होणार की नाही?राजकारण्यांची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच होईल, माझा अकोले विधानसभा मतदार संघ हा आदिवासी आणि जंगल क्षेत्र व अतिवृष्टी असलेला मतदारसंघ परंतु आज मतदारसंघात लोकप्रतिनिधिंच्या इच्छाशक्तीच्या जोरावर मूलभूत सुविधा आरोग्य सेवा,रस्ते, शिक्षणाच्या सुविधा भक्कमपणे उभ्या राहिल्या आहेत परंतु जेंव्हा आमदार डॉक्टर किरणजी लहामटेसाहेब यांनी तिरंगा जन संवाद यात्रा काढली आणि गावोगाव भेटी देऊन अडीअडचणी जाणून घेतल्या तेंव्हा त्यांची यात्रा मतदारसंघातील “टास्टीकवाडी ” या गावात गेली आणि भयाण वास्तव समोर आलं की या गावात ७८ वर्षात लोकप्रतिनिधी (आमदारच) आलेला नाही अशी तक्रार गावकऱ्यांनी केली.
आमदारांनी त्यांच्या रस्त्यांचे, आरोग्याचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले परंतु सांगण्याचा उद्देश एकच आहे की आपल्या देशातील अनेक भाग असे आहेत की तेथे मूलभूत सुविधाच पोहचलेल्या नाही जर राजकारण्यांनी इच्छाशक्ती ठेवली तर नक्कीच बदल होऊ शकतो.ही इच्छाशक्ती या राजकारण्यांना देवो अशी आपण अपेक्षा करूयात.
आपलाच,
श्री.तात्यासाहेब अशोकराव देशमूख.
(संस्थापक/अध्यक्ष – मातोश्री शांताई देशमूख सोशल फाउंडेशन )
Leave a reply