Disha Shakti

इतर

रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्याची गरज; क्रांतीसेनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर.आर जाधव :‌ रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेचे अर्ज महाडीबीटीच्या धर्तीवर आँनलाईन पद्धतीने स्विकारण्याची मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात राहुरी तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सचिन औटी तसेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले.

सदर निवेदनात म्हटले आहे की, “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर महाराष्ट्र समृध्द” करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. यातीलच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी या योजनेचे अर्ज महाडीबीटीच्या धर्तीवर आँनलाईन पद्धतीने स्विकारण्याची गरज आहे.

महाराष्ट्रात जातपात, पक्ष, राजकीय द्वेष त्यागून ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्यांनी आणि त्याचप्रमाणे गावातील नागरिकांनी गावाच्या विकासासाठी सहकार्य केल्यास आदर्श ग्राम होण्यास वेळ लागणार नाही. परंतु बहुतेक ठिकाणी सरपंच व सदस्य आपली विचारसरणी सोडायला तयार नसल्याने नागरिकांना अनेक योजनांपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात निधी मिळूनही खेड्यापाड्यांचा विकास खुंटला आहे. याचेच जातीवंत उदाहरण म्हणून कोंढवड, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथील दोन पशुपालक शेतकऱ्यांचे गोठा प्रकरणाला सन २०२२ मध्ये प्रशासकीय मंजुरी मिळूनही दोन वर्षांनंतरही या योजनेचा कुठलाही लाभ न मिळाल्याने “नेमकी माशी कुठे शिंकली” हेच कळायला मार्ग नाही.

तसेच २०२३ मध्ये येथील ५ पशुपालक शेतकऱ्यांचे गोठा प्रकरणे ग्रामपंचायतीने पंचायत समितीत जमा केले होते. या पशुपालकांचे प्रकरणे मंजूर होणे तर दूरच पण स्थळ पाहणीसही कोणी अधिकारी फिरकला नाही. सदर प्रकरणासंदर्भात ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीत चौकशी केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने सरकार राबवित असलेल्या योजनांचा फज्जा उडत आहे. त्यामुळे तातडीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत सुरू असलेल्या सर्व योजनांची प्रक्रिया थांबवून नागरिकांना सदर योजनांचा लाभ मिळण्याबरोबरच या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आँनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, सुरेश एकनाथ म्हसे, संदीप ओहोळ, ज्ञानेश्वर भिंगारदे, सचिन गागरे, शेखर पवार, शिवाजी म्हसे, प्रशांत जोशी, योगेश उंडे, अविनाश म्हसे, संदीप लांडगे, प्रशांत गागरे आदींसह नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!