दिशाशक्ती संगमनेर / गंगासागर पोकळे : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील केळेवाडी येथील शेतकरी मंगळवारी (दि. 10 सप्टेंबर) पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चार चोरट्यांच्या झटापटीत एक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की केळेवाडी येथील शेतकरी विश्वास मारुती लामखडे (वय 36) हे नेहमीप्रमाणे सोमवारी रात्री पत्नी आणि ते जेवण करुन झोपी गेले होते. त्यानंतर पहाटे तीन वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी प्रात:विधीसाठी उठली असता घराच्या बाहेर आल्या. तेव्हा बाहेर चार चोरटे उभे होते. त्यांना पाहून त्या जोरात ओरडून घरात आल्या आणि दाराची कडी लावली. याचा आवाज आल्याने विश्वास लामखडे यांना जाग आली. ते घराच्या बाहेर पडवीत आले असता अंधूक प्रकाशात चौघेजण वेगवेगळी हत्यारे घेऊन उभे होते. त्यांना प्रतिकार केला असता एकाने कुर्हाड उगारुन शांत राहण्याचा दम दिला. याचवेळी झटापट चालू असताना एकाने कोणत्या तरी हत्याराने डोक्यावर वार केला. तेव्हा मोठा रक्तस्त्राव येऊ लागला, अशा अवस्थेतही त्यांच्याशी प्रतिकार सुरूच होता. ज्वारीच्या शेतात हा भयानक प्रकार सुरू असताना गंभीर दुखापत झाल्याने लामखडे तसेच पडून राहिले. याच संधीचा फायदा उठवून चोरट्यांनी घरात प्रवेश करुन कपाटातील सामानाची उचकापाचक करुन पाकिटासह रोख सात हजार रुपये आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरुन डोंगरात निघून गेले. त्यानंतर आसपासचे शेतकरी गोळा झाले आणि जखमी झालेले लामखडे यांना बोटा येथील दवाखान्यात नेले. पुढील उपचारांसाठी आळेफाटा येथील रुग्णालयात हलविले आहे. याप्रकरणी जखमी शेतकरी विश्वास लामखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी हरीष खेडकर व पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच श्वान व ठसेतज्ज्ञांच्या पथकाला पाचारण केले होते.
केळेवाडीत चोरट्यांचा धुमाकूळ शेतकऱ्याच्या डोक्यात हत्याराने वार करत केला प्राणघातक हल्ला

0Share
Leave a reply