Disha Shakti

क्राईम

बायको नांदायला येत नसल्याने सख्या मेहुण्याच्या ३ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून हत्या

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : नात्याला काळीमा फासणाऱ्या घटनेने श्रीरामपूर तालुक्यातील खळबळ उडाली आहे. बायकोसोबत जमत नसल्याने आणि सासुरवाडीत आल्यानंतर मेहुण्यासोबत भांडण झाल्याने त्याने त्याचा राग मनात धरून नराधमाने धक्कादायक काम केलं आहे. सख्या मेहुण्याच्या स्नेहदिप त्रिभुवन नावाच्या ३ वर्षीय चिमुकल्याचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्रीरामपूर पोलिसांनी हत्येचा उलगडा करत आरोपी राहुल बोधक या नराधमाला ताब्यात घेतलंय. या घटनेने श्रीरामपूरसह अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बायको नांदायला येत नाही म्हणून वैजापूर येथील राहुल बोधक हा आठ दिवसांपूर्वी श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सासुरवाडीला आला होता. तिथे मेहुण्याशी (बायकोच्या भावाशी) वाद झाल्यानंतर भांडणाचा राग मनात धरून आरोपीने मेहुण्याचा मुलगा स्नेहदिप त्रिभुवन याचे अपहरण केले होते. यासंदर्भात ६ सप्टेंबर रोजी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात आरोपी राहुल बोधक याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी वैजापूर तालुक्यातून आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर आरोपीने चिमुकल्या मुलाची हत्या केल्याची कबुली दिली.

मात्र मृतदेह नेमका कुठे फेकला याबाबत विचारणा केली असता आरोपी राहुल उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी सर्व बाजूने तपास करत प्रकरणाचे धागेदोरे जुळवले आणि अखेर वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला ते संभाजीनगर रोडवरील गारच शिवारातील एका मक्याच्या शेतात चिमुकल्याचा मृतदेह शोधून काढला. नराधम आरोपी राहुल बोधक याने स्नेहदिप याला तोंड दाबून मारल्याची कबुली पोलिसांना दिली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हत्येचा अधिक उलगडा होईल. याप्रकरणी अधिक तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!