Disha Shakti

इतर

राहुरी तालुक्यातील शेणवडगाव येथे दोन शाळकरी मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न

Spread the love

राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील शेणवडगाव येथे जिल्हा परिषद शाळेतील दोन विद्यार्थ्यांचे काल सोमवारी अज्ञात इसमांनी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी, शेणवडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असलेले सत्यम परसराम जाधव व वेदांत प्रदीप जाधव हे दोन विद्यार्थी नेहमीप्रमाणे शाळेत जात असताना पाथरे खुर्द गावच्या दिशेने दुचाकीवरून येणार्‍या अज्ञात दोन इसमांनी सत्यम जाधव या विद्यार्थ्यांला पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना हा प्रकार त्याचे चुलते नानासाहेब जाधव यांनी पाहिले व आरडाओरडा सुरू केला. त्या वेळी तात्काळ गावातील काही युवक त्याठिकाणी आले.

परंतु, या दोन अज्ञात इसमांपैकी एक एक इसम दुचाकी घेऊन पळून गेला व दुसरा शेजारच्या वामन जाधव यांच्या उसाच्या फडामध्ये पसार झाला. हे गावकर्‍यांना समजताच त्या उसाला सुमारे 500 युवकांनी चहुबाजूंनी घेराव घातला. मात्र तो इसम पळून जाण्यात यशस्वी झाला. शाळेतील मुलांचे अपहरण करणारी टोळी कार्यरत झाल्याच्या भितीने परिसरातील पालकवर्ग चिंतीत झाला आहे. या घटनेची माहिती गावकर्‍यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिली असता तात्काळ कॉन्स्टेबल दिगंबर सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून गावकर्‍यांना दिलासा दिला आहे.

गावातील युवकांनी गस्त घालून गावात नवखा व्यक्ती दिसल्यास त्याची चौकशी केली पाहिजे. या घटनेमुळे गावकर्‍यांनी घाबरून न जाता ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या संपर्कात रहावे.
– कविता जाधव, सरपंच, शेणवडगाव


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!