अ.नगर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी धनगर समाजाच्या दोघा आंदोलकांनी गुरुवार (दि.26) रोजी प्रवरासंगम येथील गोदावरी नदीमध्ये जलसमाधी घेतल्याचा संशय व्यक्त केला जात होता. त्यांचा काल रात्री रात्रभर शोध सुरू होता. अखेर आज सकाळी हे दोन आंदोलन पूलापासून २ किमी अंतरावर म्हाळापुर शिवारात झोपलेल्या अवस्थेत सुदैवाने जीवंत आढळून आले आहेत. दरम्यान रस्ता चिखलमय असल्याने त्यांना बैलगाडीतून मुख्य रस्त्यावर आणण्यात आले.
त्यानंतर शासकीय वाहनाने नेवासा फाटा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाब नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी माहिती दिली. दरम्यान आज सकाळी रामराव कोल्हे (रा. कारला, ता. जि. जालना) नावाचा आंदोलक गायब झाला होता, त्याला देखील पुलावर फिरताना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मागील ९ दिवसापासून नेवासा फाटा येथे आंदोलन सुरु आहे. धनगर समाजाचे ६ जण उपोषणासाठी बसले होते. त्यामधील बाळासाहेब कोळसे (रा. आडगाव ता. पाथर्डी) व प्रल्हाद चोरमारे (रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे प्रातःर्विधीला जावून येतो असे सांगून उपोषणस्थळावरून निघून गेले व धनगर समाजाच्या नजन नामक एका कार्यकर्त्याला फोन केला की, ‘आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार’ असे सांगून फोन बंद केला. तसेच त्यांनी छत्रपती संभाजी नगर- अहमदनगर मार्गावरील प्रवारासंगम नदीच्या पुलावर ही चिठ्ठी एका कारवर ठेवली होती. तसेच बाजूला आपला मोबाईल आणि चपलाही ठेवल्या होत्या.
त्यानंतर ते गायब झाले होते. त्यांनी जलसमाधी घेतली असल्याची शक्यता व्यक्त करून एनडीआरएफ पथक आणि प्रशासनाने त्यांचे शोधकार्य ही हाती घेतले होते. रात्र झाल्याने हे शोधकाम थांबवण्यात आले होते. अखेर शुक्रवारी सकाळी हे दोघेही आंदोलक नदीपात्र परिसरात मिळून आले आहे.
Leave a reply