दिशाशक्ती प्रतिनिधी / जावेद शेख : मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे शेतकऱ्यांनी रक्ताचे पाणी करून उसाचे उत्पादन घेतले परंतु यावर्षी उत्पादनात मागील वर्षापेक्षाही उत्पादन कमी होणार आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी उसाचा भाव आचारसंहितेपूर्वी जाहीर करावा अन्यथा यावर्षी उसाचे गळीत सुरू होऊ देणार नाही असा इशारा रयत क्रांती संघटनेने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे.
प्रसिद्धस दिलेल्या निवेदनात पुढे सांगितले की, सन २०२४/२५ चा उसाचा पहिला हप्ता चार हजार रुपये जाहीर करावा व मागील वर्षीचा २०२३/२४ चा दुसरा हप्ता चारशे रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत. यावर्षी केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली असल्यामुळे चार हजार रुपये भाव देणे सहज शक्य आहे. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांनी आचारसंहिता लागण्याआधी भाव जाहीर केला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील. सोलापुरात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी भाव जाहीर केला. पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गेलेल्या उसाला ३६५० रुपये भाव दिला मग नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २७००/२८०० भाव का घ्यायचा? त्यामुळे शेतकऱ्यांचा अंत घेऊ नका, आमच्या घामाला दाम द्या, आम्हाला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ देऊ नका.
आचारसंहितेच्या पूर्वी नगर जिल्ह्यातील ऊस दर जाहीर करा अन्यथा रयत क्रांती संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे. निवेदनाची प्रत निवासी नायब तहसीलदार श्री राजेंद्र पाटील यांना देण्यात आलेली आहे. निवेदनावर रयत क्रांती संघटनेचे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश पवार, जगुभाऊ पवार, भिकाभाऊ रेवाळे, आकाश निशाने, पंकज देठे, सुनील पवार, पांडुरंग देठे, माऊली निशाने आदींच्या सह्या आहेत.
Leave a reply