पारनेर प्रतिनिधी / वसंत रांधवण : चारित्र्याचा संशय घेऊन पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप घाव घालून खून केल्याची घटना पारनेर तालुक्यातील ढवळपूरी येथे घटस्थापनेच्या दिवशी घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो असफल झाला.
यासंदर्भात स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार वनकुटे रोड,बोरवाक मळा, ढवळपूरी येथिल राजाराम रेवजी थोरात (वय ७०) व त्याची पत्नी ताराबाई राजाराम थोरात (वय ६५) यांच्यात गुरुवारी सकाळी घरामध्ये वाद झाले. राजाराम याचा पत्नी ताराबाई हिच्यावर चारित्र्याचा संशय होता. त्याच रागातून राजाराम याने पत्नी ताराबाई हीस चटके देऊन त्यानंतर शेजारच्या कपाशीच्या शेतामध्ये नेऊन कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार केले. त्यात पत्नी ताराबाई हिचा जागीच मृत्यू झाला.
गुरुवारी सकाळी ही घटना घडली त्यावेळी राजारामचा मुलगा संजय हा शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. तर सुन आशा जनावरे चारण्यासाठी गेल्या होत्या. त्या घरी आल्या असता घरामध्ये भाकरी अस्ताव्यस्त पडलेल्या आढळून आल्याने त्यांना संशय आला. त्यांनी सासरा राजाराम यांच्याकडे आत्या कुठे गेल्या याची विचारणा केली असता राजाराम याने हाताने विहीरीकडे बोट दाखविले. सासू – सासऱ्यांमध्ये भांडण होऊन सासऱ्याने सासूला विहिरीत ढकलून दिल्याचा संशय सून आशा यांना आला. त्यांनी विहीर परिसरात पाहणी केली असता त्यांना तेथे काही आढळून आले नाही. सुन आशा या सासू न सापडल्याने परत घरी आल्या. त्यावेळी घरामध्ये राजाराम याने फाशी घेण्याचा प्रयत्न केला होता. सून आल्या त्यावेळी दोरी तुटल्याने गळ्याला दोरी बांधलेल्या अवस्थेत राजाराम जमीनीवर पडलेला होता. आशा यांनी आजूबाजूच्या लोकांना बोलावून राजाराम यास रुग्णालयात दाखल केले.
सायंकाळी राजाराम शुध्दीवर आला. राजाराम यास रुग्णालयात दाखल केल्यानंतर आशा व त्यांच्या मुलाने सासूचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असताना घराजवळच्या कपाशीच्या शेतामध्ये ताराबाई यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. मृतदेहाजवळ गुन्ह्यात वापरण्यात आलेली कुऱ्हाडही आढळून आली. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. आशा संजय थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजाराम रेवजी थोरात वय ७० यांच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
ढवळपूरीत पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, ६५ वर्षीय पत्नीवर चारित्र्याचा संशय

0Share
Leave a reply