विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने खून केल्याची घटना शेवगाव तालुक्यातील विजयपूर येथे शुक्रवारी घडली. पोलिसांच्या तपासातून ही माहिती पुढे आली असून, त्या दोघांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग जाधव (३२, रा. विजयपूर, ता. शेवगाव) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. मयताचे वडील पांडुरंग बाबासाहेब जाधव यांनी शनिवारी (दि. ५) शेवगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विजयपूर येथील ज्ञानेश्वर जाधव याच्या पत्नीशी अनिल ज्ञानदेव जगदाळे याचे अनैतिक संबंध होते. त्यामुळे पती ज्ञानेश्वरचा खून करून अडसर दूर करण्यासाठी पत्नी व अनिल जगदाळे यांनी कट रचला. त्यानुसार शुक्रवारी (दि. ४) ज्ञानेश्वर जाधव याला अनिल जगदाळे याने मारहाण केली. नंतर डोक्यात, हातावर, छातीवर लोखंडी गजाने मारहाण करून ठार मारले. ज्ञानेश्वरचा खून करून त्याची पत्नी व अनिल जगदाळे दोघेही गायब झाले होते.
खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस निरीक्षक समाधान नांगरे यांनी तपासाची चक्रे फिरविली. दोन पोलिस पथके स्थापन करून बिडकीन, पैठण व छत्रपती संभाजीनगर भागात रवाना केले होते. पोलिस पथकाने आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता, त्यांनी दोघांनी खुनाची कबुली दिली. ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. समाधान नागरे, सपोनि धरमसिंग सुंदरडे, सपोनि अमोल पवार, परशुराम नाकाडे, नीलेश म्हस्के, नितीन भताने, किशोर काळे, संभाजी धायतडक, श्याम गुंजाळ, बाप्पा धाकतोडे, संतोष वाघ, राहुल खेडकर, प्रशांत आंधळे यांनी केली.
Leave a reply