श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : शहरातील लक्ष्मी त्र्यंबक मंगल कार्यालय या ठिकाणी कॉंग्रेस कार्यकर्ता संकल्प मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधान मंडळाचे व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या निवडणूकपूर्व कार्यकर्त्यांचा संकल्प मेळावा म्हणजे प्रचंड मोठे शक्तीप्रदर्शनच होते. दस्तूरखुद्द विधिमंडळ पक्षाचे नेते आ. थोरात यांची उपस्थिती व त्यांच्याच हस्ते प्रकाशित करण्यात आलेला आ. कानडे यांच्या कार्यकाळातील जनकार्य अहवालाचे प्रकाशन या गोष्टी श्रीरामपूरची उमेदवारी पुन्हा विद्यमान आमदार लहु कानडे यांनाच मिळेल याचे स्पष्ट संकेत आहेत.
यामुळे पक्षातीलच एका इच्छुकाने उमेदवारी बाबत निर्माण केलेल्या संभ्रम आ. थोरात यांच्या उपस्थित असण्याने दूर झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. श्रीरामपूर तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या संकल्प मेळावा पार पडला. यावेळी आ. कानडे यांच्या सन २०१९ – २०२४ या कार्यकाळातील जनकार्य अहवालाचे तसेच आ. कानडे लिखित पाच पुस्तकांचे प्रकाशन आ. थोरात, ज्येष्ठ साहित्यिक व माजी संपादक उत्तम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी आ. डॉ. सुधीर तांबे हे होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितलभैया वाबळे, तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, अमृत धुमाळ, माजी नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख, रवींद्र गुलाटी, राजेश अलग, मुख्तार शहा, विजय शेळके, कलीम कुरेशी, प्रकाश ढोकणे, मोहम्मद शेख, सलीम शेख, भाऊसाहेब मुळे, मल्लू शिंदे, प्रा. कार्लस साठे, ॲड. समीन बागवान, अशोक कारखान्याचे माजी संचालक लाल पटेल, राहुरी बाजार समितीचे संचालक रखमाजी जाधव, आदिवासी संघटनेचे शिवाजी गांगुर्डे, पी. एस. निकम, विष्णुपंत खंडागळे, श्रीरामपूर विधानसभा पक्ष निरीक्षक मधुकरराव नवले यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. थोरात म्हणाले, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आ. कानडे यांनी पाच वर्षात केलेली विकास कामे त्यांच्या जनकार्य अहवालात सामावली आहेत. त्यांनी स्वतःचे कौशल्य वापरून विकास कामांसाठी निधी आणून कामे केली. त्यासाठी मोठी धडपड केली. साहित्यिक लेखक प्रशासकीय कामाचा अनुभव तसेच विकास कामांचा ध्यास असलेले आ. कानडे माझ्यासोबत विधानसभेत असणे आवश्यक आहे. आ. कानडे लेखक आहेत. जीवनाचा अर्थ सांगणारे समाज जीवनातील दोषांवर बोट ठेवणारे व त्याचे उत्तर सांगणारे लेखक आहेत. लेखक व प्रशासनातील अधिकारी राजकारणात येऊन समाजाचे दुःख समजावून घेऊन त्यांचे प्रश्न कसे सोडवता येतात, त्याचे उत्तम उदाहरण आ. कानडे आहेत. त्यांनी सुंदर पुस्तकांची निर्मिती केली आहे. पाच वर्षातील कार्यकाळाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला आहे. त्यांचे व माझे जीवाभावाचे नाते आहे. राज्यात काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी या पक्षाचे आमदार अधिक असणे आवश्यक असून त्यासाठी आ. कानडे हे आपल्यासोबत असणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यावेळी आ. थोरात यांनी केंद्र सरकार व राज्यातील महायुती शासनावर जोरदार टीका केली. धर्माचे राजकारण करायचे, दंगली घडवायच्या आणि आपल्या मतांची पोळी भाजायची, ही भाजपाची पद्धत आहे. केंद्र राज्यातील सरकारचा उद्देश पुन्हा चातुर्वाद, मनुवाद आणणे हा आहे. हे सरकार देश, समाज व संविधान मोडायला निघाले आहेत, हे जनतेने ओळखले पाहिजे. सत्तेसाठी त्यांनी लाडकी बहीण योजना आणली मात्र त्यांना बहिण लाडकी नसून सत्ता लाडकी असल्याची टीका त्यांनी केली.
आ. कानडे यांच्या निमित्ताने राज्याच्या राजकारणात चमत्कार घडल्याचे सांगून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले, राजकारणात खूप कमी साहित्य आहेत. तसेच साहित्य समजून घेणारे खूप कमी राजकारणी आहेत. लेखक साहित्यिक व प्रशासकीय अनुभव असणारे विधानसभा निवडणुकीला उभे राहून जिंकून येणारे दुर्मिळ उदाहरण म्हणजे आ. कानडे होय. ते समोरच्या दाराने आले आहेत. राज्याच्या साहित्य क्षेत्रातील हे नवे वळण आहे. राजकारण सुंदर स्वच्छ व नैतिक व्हायचे असेल तर त्या क्षेत्रातील माणसांचा वावर वाढला पाहिजे. त्यामुळे सामान्य माणसांचा विश्वास वाढतो, चांगले राजकारण पाहिजे असेल तर चांगल्या माणसाला निवडून दिले पाहिजे. जाती-धर्माच्या, पंथाच्या प्रवाहाचे राजकारण समाजाला नको आहे. समाजाचा विचार करणारा हा साहित्यिक असल्याचे ते म्हणाले.
आ. थोरात कमी बोलतात परंतु निर्णय योग्य घेतात. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगून डॉ. तांबे म्हणाले, आ. कानडे यांनी जनकार्य अहवालातून केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी यांना सुराज्य पाहिजे होते. संविधानाच्या माध्यमातून जनतेला मतांचा अधिकार मिळाला. परंतु हे संविधान मोडण्याचे काम सुरू आहे. संविधान वाचवण्याची जनतेची जबाबदारी आहे. सोंग घेऊन येणारे लोक खूप असतात. त्यांना ओळखायला शिकले पाहिजे. लोकशाहीच्या बाजूने उभे राहणे हे आपले कर्तव्य आहे. अन्यथा पुढील पिढी आपल्याला माफ करणार नाही, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, तालुक्यातील जनतेने २०१९ साली मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. आपण ती जबाबदारी मानली. या कार्यकाळात आ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रामाणिकपणे काम केले. मतदारांसमोर केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे, ही भूमिका घेऊन आपण अहवाल प्रकाशित केला आहे. आ. थोरात केवळ गटनेते नसून ज्येष्ठ नेते आहेत. महायुती सरकार आल्यापासून त्यांनी विधानमंडळात सर्वाधिक प्रश्न विचारले. जनतेचे दुःख प्रश्न त्यांनी मांडले आहेत. काँग्रेस पक्ष अनेक संकटातून गेला आहे. मात्र आ. थोरात पक्षाला बळ देत ठामपणे उभे आहेत. प्रतिगामी शक्तीने धर्मांध नावाने राजकारण सुरू केले. त्याने प्रत्येक म्हणून व्यथित झाला आहे. भाजपची मंडळी समाजात विस्फोट निर्माण करू पाहत आहे. अशावेळी आ. थोरात यांनी काँग्रेसचा विचार पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला असल्याचे सांगून आ. कानडे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला.
महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष लताताई डांगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अंजुम शेख, वळदगावचे सरपंच अशोक भोसले, अमृत धुमाळ, सचिन ब्राह्मणे, मल्लू शिंदे, शिवाजी गांगुर्डे, विष्णुपंत खंडागळे, अनिल ढोकचौळे, दवणगावच्या खपके ताई यांनी आपल्या मनोगतातून आ. कानडे यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेत येत्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी आग्रही मागणी करत त्यांना पुन्हा निवडून आणू, अशी ग्वाही दिली. आमदार कानडे एकटे असल्याचे विरोधक सांगत होते. मात्र तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आ. कानडे यांना समर्थन देत त्यांना निवडून आणण्यास कटिबद्ध आहोत, असे सांगत विरोधकांना चोख उत्तर दिले तसेच आ. थोरात यांच्या स्पष्ट संकेताने त्यांना मोठी चपराक मिळाली, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा होती. ऍड. समीन बागवान यांनी स्वागत केले. तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी महिला तालुकाध्यक्षपदी प्रीतीताई जगताप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी करून त्यांना आ. थोरात यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी उद्योजक अंकुश कानडे, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, बाबासाहेब कोळसे, रज्जाक पठाण, दीपक कदम,अक्षय नाईक, मुदस्सर शेख, संभाजी कदम, सुखदेव मुसमाडे, नारायण टेकाळे, अजय खिलारी, रवीअण्णा गायकवाड, सचिन ब्राह्मणे, शिवाजी शेजुळ, डॉ. सर्जेराव सोळंके, दीपक पवार, महिला तालुकाध्यक्ष प्रीतीताई जगताप, तालुका समन्वयक रुबीना पठाण, कविताताई कानडे, विजय शेलार, सुरेश पवार, सरपंच अविनाश पवार, आबा पवार, रमेश आव्हाड, राजेंद्र कोकणे, राजेंद्र ओताडे, सरपंच सागर मुठे, अमोल आदिक, हरिभाऊ बनसोडे, प्रताप पटारे, सुदाम पटारे, दीपक निंबाळकर, नानासाहेब रेवाळे, महेश खंडागळे, अनिल बीडे, ऍड. मधुकर भोसले, संदीप दांगट, शिवाजी वाबळे, नानासाहेब बडाख, विलास तुपे, बाळकृष्ण मुंगसे, भाऊसाहेब थेवरकर, नारायण रिंगे, आप्पासाहेब पवार, ज्ञानेश्वर बिडगर, सुभाष नान्नोर, शरद पवार, युवराज पवार यांच्यासह श्रीरामपूर तालुका शहर व ग्रामीण तसेच राहुरी तालुक्यातील ३२ गावातील गाव कारभारी, मतदार संघातील मराठा,आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्यांक यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a reply