पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : शासकीय विद्युत ठेकेदाराकडून पाच हजारांची लाच घेताना महावितरणचा सहाय्यक अभियंता राकेश पुंडलिक महाजन (वय 42 रा. सटाणा, जि. नाशिक) याला रंगेहाथ पकडले. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल, मंगळवारी ही कारवाई केली. त्याच्या विरोधात सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय ठेकेदारांना वाळवणे (ता. पारनेर) येथील खासगी रिसॉर्टच्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम मिळाले आहे. सदर कामाचे अंदाजपत्रक तयार करून देण्याकरिता सुपा (ता. पारनेर) येथील सहायक अभियंता कार्यालयात कार्यरत असलेला सहाय्यक अभियंता महाजन याने ठेकेदाराकडे लाच मागणी केली होती. तशी तक्रार ठेकेदारांनी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (14 ऑक्टोबर) केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने काल, मंगळवारी (15 ऑक्टोबर) लाच मागणी पडताळणी केली असता महाजन याने तक्रारदाराकडे पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, तक्रारदाराकडून पाच हजार रुपये स्वीकारताना महाजन याला पथकाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे- वालावलकर, पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदरची कारवाई केली आहे.
Leave a reply