नाशिक प्रतिनीधी / खंडू कोळेकर : नाशिकमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या एका महिलेने मुलाला जन्म दिला. मात्र डिस्चार्ज करताना रुग्णालयाने त्यांच्या हातात मुलगी दिल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत बाळ घेण्यास नकार दिला ज्यानंतर मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात एक महिला प्रसुतीसाठी गेली होती. या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला. मात्र रुग्णालयातून डिस्चार्ज देताना त्यांना मुलगी झाल्याचे सांगण्यात आले आणि बाळही हातात दिले. या प्रकाराने नातेवाईकही अवाक झाले. जिल्हा रुग्णालयाच्या रजिस्टरवर देखील मुलगा झाल्याची नोंद होती मात्र रुग्णालयाने त्यांना मुलगी झाल्याचे सांगताच नातेवाईक अवाक झाले.
रुग्णालय प्रशासनाच्या या कारभारानंतर नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरापर्यंत चांगलाच गोंधळ घातला. तसेच अपत्य ताब्यात घेण्यासही नकार दिला. यावेळी पीडित महिलेच्या कुटुंबियांकडून प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने रुग्णालय प्रशासनास जाब विचारला. याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि नातेवाईक यांच्यात चर्चा सुरूच असून जिल्हा शल्यचिकित्सकांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेत. या प्रकरणाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर, जन्माला आला मुलगा पण डिस्चार्ज वेळी हातात दिली मुलगी

0Share
Leave a reply