Disha Shakti

राजकीय

श्रीरामपूरच्या उमेदवारीचा पेच कायम, महाविकास आघाडी आणि महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने बंडखोरीची शक्यता

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : आगामी विधानसभा निवडणूक महिनाभरावर येऊन ठेपली आहे. महाआघाडी तसेच महायुतीकडून अनेक मतदारसंघांत उमेदवार निश्चित होत आहेत. परंतु श्रीरामपूर मतदार संघात उमेदवारीचा ‘पेच’ अद्याप कायम आहे. इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने दोन्ही बाजूकडून उमेदवारी नेमकी कोणाला निश्चित होणार, याकडे श्रीरामपुरातील मतदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रमुख पक्षांचे उमेदवार जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात बंडखोरीची शक्यता असल्यानेच उमेदवारीची घोषणा लांबविली जात असल्याची चर्चा आहे.

श्रीरामपूर मतदारसंघ सन 2009 मध्ये राखीव झाल्यापासून याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार विजयी झालेला आहे. यावेळी काँग्रेसकडे विद्यमान आमदार लहू कानडे तसेच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले या दोघांनीही उमेदवारीचाी मागणी केली आहे. गेल्या आठवड्यामध्ये शिर्डी येथे काँग्रेसचे पक्ष निरीक्षक आले होते. त्यांच्यासमोर लहू कानडे व हेमंत ओगले यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत शक्तिप्रदर्शन केले. दोघांनीही उमेदवारी आपल्याला मिळावी, म्हणून पक्ष श्रेष्ठींकडे आपापल्या परीने जोर लावला आहे. परंतु, अद्यापही काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून उमेदवार कोण हे जाहीर झालेले नाही.

तोच प्रकार महायुतीत देखील पाहायला मिळतो. शिवसेना शिंदे गटाकडे श्रीरामपूर विधानसभेची जागा गेल्याचे मानले जाते. शिंदे गटाकडून माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव प्रशांत लोखंडे, श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे तसेच पढेगावचे उद्योजक जितेंद्र तोरणे, माजी अधिकारी नितीन उदमले यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. मतदार संघामध्ये आपण किती सरस आहोत हे पक्षश्रेष्ठींना समजण्यासाठी व पक्षश्रेष्ठींचे लक्ष आपल्याकडे वेधण्यासाठी प्रत्येकाने आपापल्यापरीने शक्तीप्रदर्शन देखील केले आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हे कित्येक दिवसांपासून कामाला देखील लागले आहेत.

खासदार पुत्र प्रशांत लोखंडे यांनीही आपला जनसंपर्क वाढविला आहे. माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, खासदार पुत्र प्रशांत लोखंडे, नितीन उदमले तसेच जितेंद्र तोरणे यांनी आपापल्यापरीने पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारी आपल्याला देण्यात यावी अशी मागणी केली आहे. परंतु शिवसेना शिंदे गटाकडूनही अद्याप उमेदवार निश्चित नाही. एकूणच विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण होत आहे. म्हणजेच मतदान अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपले आहे. परंतु श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात दोन्ही पक्षांकडून उमेदवारी नेमकी कुणाला हा पेच कायम आहे. उमेदवार कोण ठरणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!