Disha Shakti

राजकीय

बारामती, नागपूरात उमेदवार देणार, कुणालाही सोडणार नाही; जानकरांचा फडणवीस-अजितदादांना इशारा…

Spread the love

दिशाशक्ती  न्यूज नेटवर्क  : रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीला सोडचिठ्ठी दिली. महायुतीतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी युतीविरोधातच दंड थोडपले. जानकर स्वबळावर सर्वच जागांवर उमेदवार देणार असून ते प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सभा घेणार आहेत. विशेषत: एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मतदारसंघात उमेदवार देऊन आपण सभा घेणार आहे, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा जाणकरांनी दिला.

आज माध्यमांशी बोलतांना जानकर म्हणाले की, राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाचे मेळावे, बैठका सुरू आहेत. अनेक विधानसभा मतदारसंघांचे मिळून मेळावे घेतले जात आहेत. आधी मेळावे घेऊन सक्षम उमेदवार निश्चित करू. लोकांचे मत जाणून घेऊ. त्यानंतर संसदीय मंडळाकडे उमेदवारांची यादी पाठवू. उमेदवार निवडीचा अंतिम निर्णय पार्लमेंटरी बोर्डाकडे आहे, असं जानकर म्हणाले.

अजित पवारांची बारामती, देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर, बावनकुळेंच्या कामठीत मी सभा घेणार आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्याही कराडमध्येही सभा घेणार आहे. संपूर्ण राज्यात सभा घेणार आहे. मी या निवडणुकीत कोणालाही सोडणार नाही, असा इशारा जानकरांनी दिला.महायुतीवर घणाघाती टीका करताना ते म्हणाले, मी देणारा आहे. घेणारा नाही. विधान परिषदेवर मला घेत होते. पण मी घेतली नाही. महायुतीतील समाविष्ट पक्षांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला जागवाटपाच्या चर्चेसाठी बोलावलं नाही. त्यामुळं आम्ही महायुतीतून बाहेर पडलो. महायुतीत लहान पक्षांचा टिकाव लागणं अवघड असून भाजप कधीच छोट्या पक्षांना मोठं होऊ देत नाही.

भाजप आणि काँग्रेस आम्हाला समान अंतरावर आहेत. दोन्ही मोठे पक्ष, छोट्या पक्षांना खात आहे, अशी टीका त्यांनी केली.आम्ही किंगमेकरच्या भूमिकेत राहू संपूर्ण राज्यात जास्तीत जास्त उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला जास्तीत जास्त मते मिळवायची आहेत, जेणेकरून पक्ष म्हणून आमचे अस्तित्व कायम राहिलं. उद्याचे राज्य सरकार बनेल, पण मला विचारल्याशिवाय, मुख्यमंत्री बनणार नाही, असा दावाही जानकरांनी केला.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!