Disha Shakti

क्राईम

श्रीरामपूर येथे मटक्याचा धंदा चालवणाऱ्यांकडून पोलिसांनी मागितली लाच ; तिन पोलिसांविरोधात लाचलुचपतकडून गुन्हा दाखल

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : मटक्याचा व्यवसाय सुरू ठेवायचा असेल, तर पाच हजार रुपये आणि अडीच हजारांची दारूची बाटली लाच म्हणून मागणाऱ्या तीन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील रघुवीर ओंकार कारखिले, राहुल महादेव नरवडे आणि गौतम शंकर लगड या पोलिसांविरूद्ध नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांना लाच घेण्याची एवढी घाई झाली होती की सापळा रचण्यापूर्वीच त्यांनी लाच स्वीकारली. तक्रार आल्यावर पथकाने केवळ पडताळणीसाठी तक्रारदारासोबत पंच पाठविले होते. मात्र, पोलिस मागणी करून थांबले नाहीत, तर सरळ तक्रादारला घेऊन व्यवसायाच्या ठिकाणी गेले आणि पैसे घेतले. गेल्या महिन्यात ही घटना घडली. तो सापळा नसल्याने त्यावेळी आरोपींना पकडता आले नाही. त्यामुळे यासंबंधीची तांत्रिक पूर्तता करून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता आरोपींविरूद्ध अटकेची कारवाई केली जाईल.

श्रीरामपूरमधील एका मटका धंदा चालवणाऱ्याने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्याने म्हटले आहे की, हे तिन्ही पोलीस त्याच्याकडे आले. मटक्याचा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी पाच हजार रुपये हप्ता आणि सुमारे अडीच हजार रुपये किमतीची ब्रँडेड दारूची बाटली मागितली. लाचलुचपत विभागाने केलेल्या पडताळणीत मागणी सिद्ध झाली. लाच घेण्यासाठी आलेल्या पोलिसांनी चार हजार रुपये घेतले. दारूची बाटली आणि उरलेले एक हजार रुपये नंतर आणून देण्यास सांगितले. त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करणाऱ्या या व्यक्तीचा श्रीरामपूरमध्ये मटक्याचा अवैध व्यवसाय आहे. तो सुरू ठेवण्यासाठी या तीन पोलिसांनी त्याच्याकडे दरमहा सहा हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली होती. तडजोडीअंती पाच हजार रुपयांचा हप्ता घेण्याचे कबूल केले. मटका चालवणाऱ्या यासंबंधी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाकडे तक्रार केली. पथकाने पडताळणीसाठी पंच पाठवले. लाच मागणी पडताळणी दरम्यान पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखिले यांनी तक्रारदाराकडे त्याच्या मटक्याच्या व्यवसायावर कारवाई न करता व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लाचेची मागणी केली. विशेष म्हणजे तक्रारदार नको म्हणत असताना कारखिले त्याला मटक्याचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी घेऊन गेले. तेथे त्याच्याकडून चार हजार रुपये घेतले. उरलेले एक हजार रुपये व दारूच्या खंब्याची मागणी केली.

यावेळी कारखिले यांचे दोन सहकारी पोलीस लाच मागण्यासाठी प्रोत्साहन देत ती स्वीकारण्याची तयारी दर्शवत होते. त्यामुळे या तिघांविरूद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार किशोर लाड, सचिन सुद्रुक, हारुण शेख व दशरथ लाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!