दिशाशक्ती न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची अखेर बदली झाली आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांच्या बदलीसाठी सातत्याने मागणी लावून धरली होती. अखेर त्यांच्या या मागणीला यश आल्याचं दिसतंय. उद्या (5 नोव्हेंबर) दुपारी 1 वाजेपर्यंत तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नावे राज्याच्या प्रशासनाने केंद्रीय निवडणूक आयुक्तांना पाठवायचे आहेत. त्यानंतर राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकांची निवड केली जाणार आहे.
रश्मी शुक्ला यांची सेवा जून 2024 रोजी समाप्त झाली असतानाही भाजप, युती सरकारने जानेवारी 2026 पर्यंत त्यांना नियमबाह्य बढती दिली होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. तसंच रश्मी शुक्ला यांची कार्यपद्धती अत्यंत वादग्रस्त राहिली असून नियमबाह्य कामे करणे तसेच विरोधी पक्षांतील नेत्यांना धमकावण्याची कामे त्यांनी केली आहेत, असाही आरोप नाना पटोलेंनी केला होता. नाना पटोले, काँग्रेसच्या या आक्षेपानंतर आता भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. एकीकडे या निवडणुकीची धूम चालू असताना दुसरीकडे निवडणूक आोयगाने रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा आदेश दिला आहे.
विरोधी बाकावरील महाविकास आघाडीच्या आक्षेपांनंतर निवडणूक आयोगाने तत्काळ प्रभावाने रश्मी शुक्ला यांची बदली करावी, असा आदेश दिला आहे. रश्मी शुक्ला यांची बदली करून पोलीस महासंचालकपदाचा कार्यभार शुक्ला यांच्यानंतरच्या सर्वांत वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्याकडे सोपवावा, असेही निर्देश निवडणूक आयोगने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. त्या महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक आहेत. याआधी त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या केंद्रप्रमुख म्हणूनही जबाबदारी पार पाडलेली आहे. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. आता शुक्ला यांच्या बदलीनंतर त्यांच्याकडे नेमका कोणता विभाग सोपवला जाणार तसेच राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी कोणावर सोपवली जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a reply