Disha Shakti

राजकीय

पारनेमध्ये राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक वाजणार की तुतारी ? रणसंग्राम विधानसभेचा ; लक्षवेधी लढत पारनेर- नगर विधानसभा मतदारसंघ

Spread the love

विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या विधानसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या पारनेरमध्ये यंदा पुन्हा दोन मातब्बर नेत्यांच्या लढतीमुळे वातावरण तापले आहे. जिल्हा परिषद सदस्या राणीताई लंके व सभापती काशिनाथ दाते यांनी दंड थोपटले आहेत. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याबरोबरच या जिल्ह्यातील राजकारणाची सगळी संदर्भ बझलली आहेत. गेल्या विधानसभेपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले खा. निलेश लंके हे अनेक आमिषे, प्रलोभने असतानाही शरद पवारांशी एकनिष्ठ राहिले. तर काशिनाथ दाते यांनी सेनेतील फुटीनंतर शिंदे गटात आणि उमेदवारी मिळविण्यासाठी अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करत हाती घड्याळ बांधून घेतले. त्यामुळे असली व नकली राष्ट्रवादी मध्येच खरी झुंज होत असून घड्याळाची टिकटिक वाजते की तुतारी ? याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली आहे. या ठिकाणी माजी आमदार विजयराव औटी, संदेश कार्ले, विजय सदाशिव औटीसह अन्य अपक्ष ही रिंगणात आहे. मात्र त्यांचा दुरंगी लढतीवर फारसा परिणाम होताना दिसत नाही.

राजकीय दृष्ट्या या मतदारसंघाला विशेष महत्त्व आहे. या तालुक्याला सेनापती बापट व जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सारख्या विचारांचा तालुका म्हणून ओळखला जात आहे.

पारनेर २२४ हा सुरवातीच्या काळात कम्युनिस्ट आणि काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र त्या नंतर शिवसेनेच्या भगव्याचे या ठिकाणी वर्चस्व राहिले. या विधानसभा मतदारसंघावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असतानाही माजी आमदार विजयराव औटी यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघात विजय मिळविण्याची किमया साधली होती.

या मतदारसंघात नगर तालुक्यातील गावांसह पाच जिल्हा परिषद गट आहेत.
पारनेरमध्ये विजयराव औटी यांचा पराभव करणे ही २०१९ पर्यंत अशक्यप्राय बाब मानली जात होती. विजयराव औटी यांचे शिष्य निलेश लंके हे शिवसेनेमध्ये असतानाच प्रचंड लोकप्रिय झाले होते. शरद पवारांनी त्यांना शिवसेनेतून आपल्या पक्षात घेतले. आणि पारनेर विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले. तरीही ते विजयराव औटी यांच्यासमोर टिकाव धरू शकतील का, याबाबत शंका होती. मात्र,त्या निवडणुकीत औटी यांची एक चूक त्यांना भोवल्याचे सांगितले जाते. प्रचारादरम्यान त्यांनी विजयराव औटी यांच्या तापट स्वभावाचा उल्लेख केला. त्यामुळे मतदारांची निलेश लंके यांना सहानुभूती वाढली आणि ते आमदार व खासदारकीला लंके जायंट किलर ठरले.

अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार आहेत. आमदारकी नंतर माजी खा‌. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात खासदार झालेले निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके हे काशिनाथ दाते यांच्यापेक्षा काहीसे वरचढ ठरताना दिसतात.
महायुती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार काशिनाथ दाते यांना माजी खा. डॉ सुजय विखे यांच्या लोकसभेचा पराभवाचा वचपा काढण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे त्यांच्याबरोबर आहेत. महायुतीचे तालुक्यातील सर्व नेत्यांची व इतर घटक पक्षाचे नेते दाते यांना कितपत साथ देतात हे देखील या निवडणुकीत दिसून येणार आहे.

या मतदारसंघात पारनेर,निघोज, ढवळपूरी, वनकुटे, भाळवणी, टाकळीढोकेश्वर, कान्हुरपठार सुपा या औद्योगिक क्षेत्राचा समावेश होतो. या मतदारसंघात पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय, या मतदारसंघात सहकार हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. यावरून राजकारण रंगले होते परंतु निवडणूकित सहकारातील पदाधिकारी कार्यकर्ते कोणाच्या पारड्यात मत टाकणार, हे पाहावे लागेल. याशिवाय, मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी मोर्चाचा झालेला परिणाम या निवडणुकीत दिसून येईल.

राणीताई लंके यांच्या सकारात्मक बाबी

निवडणूकीतील डावपेचात मुरब्बी
खा.निलेश लंके यांच्या लोकप्रियतेचा फायदा
निलेश लंके प्रतिष्ठानची प्रचंड प्रचार यंत्रणा
नकारात्मक बाबी

केवळ घराणेशाहीचे राजकारण म्हणून विरोधकांकडून होणारा अपप्रचार
संभाषण कौशल्याचा अभाव

काशिनाथ दाते यांच्या सकारात्मक बाबी

प्रभावशाली व्यक्तिमत्त्व व उत्कृष्ट वकृत्व शैली
सभापती पदाच्या माध्यमातून मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा फायदा
महायुतीची प्रचंड प्रचार यंत्रणा
उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठीचीही प्रतिष्ठा पणाला

नकारात्मक बाबी

सततच्या पक्षांतरामुळे नकारात्मक प्रतिमा
उमेदवारी मिळविण्यासाठी उशिर झाल्याने मतदारसंघात कमी वेळ
उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबद्दल मतदारांमधील सहानुभूती


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!