Disha Shakti

अपघात

राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथे बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरडा जखमी ; बिबटे जेरबंद करण्याची ग्रामस्थांची मागणी

Spread the love

राहुरी प्रतिनीधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे दि. 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रुद्र सचिन गागरे या 5 वर्षाच्या बालवाडीत शिकणार्‍या चिमुरड्यावर हल्ला केला. मात्र, वडिलांनी आपल्या मुलाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली. या हल्ल्यात रुद्र गागरे हा गंभिर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी, राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सचिन शामराव गागरे हे आपल्या दुचाकीवरून बाजार करून घरी आले असता त्यांचा अंदाजे 5 वर्षाचा मुलगा रुद्र हा अंगणात खेळत होता.

वडील बाजाराहून आल्याने रूद्र हा वडीलांच्या दुचाकीकडे धावत आला. याचवेळी बिबट्याने रूद्र याच्यावर झेप घेतली. यावेळी सचिन गागरे यांनी मोठी हिम्मत दाखवून आपला मुलगा रूद्र याला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. आरडाओरड केल्यानतंर बिबट्याने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर लक्ष्मण झावरे यांच्या वस्तीवर येऊन बिबट्याने घरात शिरण्याचा प्रयत्न केला. तेथेही आरडाओरडा होताच, बिबट्याने धूम ठोकून थेट जगताप वस्तीवर धुमाकूळ घातला. या हल्ल्यात रुद्र याच्या पाठीला व पायाला बिबट्याने गंभिर स्वरूपाच्या जखमा केल्याने रूद्र याला तातडीने ताहाराबाद येथील ग्रामिण रुग्णायलात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार करून अहिल्यानगर येथील जिल्हा ग्रामिण रुग्णालयात पुढिल उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ताहाराबाद परिसरात बिबट्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून यामुळे ग्रामस्थ व शाळकरी मुलांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याबाबत वनविभागाला वारंवार कल्पना दिली आहे. काल सायंकाळी बिबट्याने रुद्र गागरे या लहान मुलावर हल्ला केल्याची माहिती तात्काळ वनविभागाला दिली. मात्र, वनविभागाचा एकही कर्मचारी अथवा आधिकारी घटनास्थळी किंवा जखमी मुलाच्या चौकशीसाठी आला नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये मोठा संताप आहे. वनविभागाने पिंजरे लाऊन या बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवावी.
– बापूसाहेब जगताप, सरपंच, ताहाराबाद, ता. राहुरी


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!