Disha Shakti

कृषी विषयी

विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा प्रसार दूरदर्शनच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत व्हावा – विस्तार शिक्षण संचालक डॉ.गोरक्ष ससाणे

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : सह्याद्री वाहिनीवरील शेतीविषयक कार्यक्रम शेतकर्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सध्या शेतीमध्ये डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठात ड्रोन, रोबोट व सेंन्सर्सवर आधारीत पाणी व्यवस्थापन यावर नाविन्यपूर्ण संशोधन सुरु आहे. या तंत्रज्ञानाचा प्रसार दूरदर्शनच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकर्यांपर्यंत झाला पाहिजे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी केले.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व दूरदर्शन सह्याद्री वाहिनी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि कार्यक्रम सल्लागार समिती बैठकीचे आयोजन विद्यापीठामध्ये करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरुन डॉ. गोरक्ष ससाणे बोलत होते. यावेळी मुंबई येथील दूरदर्शनचे कार्यक्रम निर्माता श्री. भारत हरणखुरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रविंद्र बनसोड, पुणे येथील दूरदर्शन केंद्राचे कार्यक्रम निर्माता श्री. विनायक मोरे, मुंबई दूरदर्शनचे कार्यक्रम निर्माता श्री. विजय मोदड व प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे उपस्थित होते.

डॉ. गोरक्ष ससाणे पुढे म्हणाले की सध्या भारतीय शेतीसमोर मोठी संकटे असून यामध्ये नैसर्गिक आपत्ती-जशी गारपीट, अवकाळी पाऊस, जास्त काळासाठी पावसाचा खंड, अतिउष्णता याचा पिकांवर होणारा परिणाम व त्यावर उपाययोजना यावरील विषयांचा अंतर्भाव दूरदर्शनवरील कार्यक्रमात होणे गरजेचे असल्याचे यावेळी ते म्हणाले. डॉ. रविंद्र बनसोड आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की माहे जानेवारी ते मार्च हे तीन महिने पाणलोट क्षेत्र विकास, सिंचन व्यवस्थापन व शेतीची पेरणीपूर्वीची तयारी करण्यासाठी महत्वाचे असतात. या कालावधीत प्रसारीत होणार्या शेतीविषयक कार्यक्रमात विद्यापीठाने तयार केलेल्या तंत्रज्ञानाच्या शिफारशी शेतकर्यांपर्यंत गेल्या पाहिजेत.

यावेळी श्री. भरत हरणखुरे यांनी मागिल बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखविले. यावेळी बैठकीला उपस्थित असलेले विभाग प्रमुख, कृषि विज्ञान केंद्रांचे प्रतिनिधी, प्रगतशील शेतकरी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेतून माहे जानेवारी ते मार्च, 2025 या कालावधीत होणार्या कृषि विषयक कार्यक्रमांचे नियोजन केले.

या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. पंडित खर्डे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार श्री. विनायक मोरे यांनी मानले. या बैठकीसाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, कृषि विज्ञान केंद्रांचे शास्त्रज्ञ, पशुसंवर्धन, जलसंपदा विभाग आणि हवामान केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!