Disha Shakti

क्रीडा / खेळ

सांघीक खेळातूनच येणार्या संघभावनेने जीवनातील अडचणींवर मात करता येते – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर.आर.जाधव : खेळामुळे आपले स्वास्थ्य चांगले राहते. मनावरील ताण कमी होवून मन एकाग्र होण्यास मदत होते. खो-खो व हॉलीबॉल हे दोन्ही खेळ सांघीक आहेत. या खेळांमध्ये एकट्याच्या प्रयत्नामुळे जिंकता येत नाही तर जिंकण्यासाठी संपूर्ण संघाला एकत्रितपणे प्रयत्न करावे लागतात. त्यातुनच येणार्या संघभावनेने जीवनातील अडचणींवर मात करता येते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे विद्यापीठस्तरीय कृषि तंत्रज्ञान क्रीडा स्पर्धा 2024-25 आयोजीत करण्यात आल्या असून या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते.

यावेळी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव डॉ. नितीन दानवले, कृषि तंत्रज्ञानचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहान, क्रीडा अधिकारी डॉ. विलास आवारी व माजी क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड उपस्थित होते.यावेळी डॉ. साताप्पा खरबडे मार्गदर्शन करतांना म्हणाले की सर्व संघातील खेळाडुंनी या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळ करुन जिंकण्यासाठी प्रयत्न करावा. जिंकण्यासाठी प्रयत्न करत असतांना मात्र सर्वांनी या खेळातुन खिलाडुवृत्ती जोपासावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना डॉ. प्रशांत बोडके यांनी खेळाडूंनी आपल्या ध्येयप्राप्तीसाठी प्रामाणीकपणे प्रयत्न करायला हवेत असे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सहभागी संघांनी उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. पुणतांबा येथील कृषि तंत्र विद्यालयातील खेळाडू देवेंद्र गिते याने सर्व खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आनंद चवई यांनी तर आभार डॉ. राहुल खुळे यांनी मानले. या कृषि तंत्रज्ञान क्रीडा स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील नऊ कृषि तंत्रज्ञान विद्यालयातील 34 संघ सहभागी झाले असून यामध्ये 155 मुली व 170 मुले असे एकुण 325 विद्यार्थी, 20 पंच सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, अधिकारी, घटक विद्यालयांचे प्राचार्य, संघ प्रमुख व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!