विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : गेल्या अडीच वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अर्थातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांचा महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांनी पराभव करून आमदारकी मिळविल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
पारनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा टाकळी ढोकेश्वर जिल्हा परिषद याच गटात पारनेर पंचायत समितीचे टाकळी ढोकेश्वर व कर्जुले हर्य दोन गण आहेत. ढवळपूरी गटात दोन गण आहेत. भाळवणी व ढवळपूरी. टाकळी ढोकेश्वर व ढवळपूरी जिल्हा परिषद गटावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील आत्तापर्यंत वर्चस्व राहिले आहेत. गतवेळच्या निवडणुकीनंतर काशिनाथ दाते यांनी या गटाचे जिल्हा परिषदेत नेतृत्व केले. तर सुप्रिया झावरे ढवळपूरी गटाचे जिल्हा परिषदेत नेतृत्व केले.
जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकांसाठी नव्याने गट आणि गण रचना जाहीर करण्यात आली होती. त्याबरोबरच आरक्षणही जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यास न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका रखडल्या.
दरम्यान राज्यात सत्तांतर झाले आणि महाविकास आघाडीला पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर राज्यात नव्याने महायुतीचे सरकार स्थापन झाले होते. निवडणुका लांबणीवर टाकण्यास त्यावेळी महायुतीस असणारे प्रतिकूल वातावरण कारणीभूत असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात होते.मात्र, आता राज्यात महायुतीला मोठे यश मिळाले असून राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यादृष्टीने इच्छुक उमेदवार निवडणूक मोर्चेबांधणी करू लागले आहेत. टाकळी ढोकेश्वर व ढवळपूरी गटात पुन्हा निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अर्थातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये पुन्हा सत्तेसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे. झालेली विधानसभा निवडणुक लक्षात घेता यावेळी टाकळी ढोकेश्वर व ढवळपूरी गटात महाविकास आघाडीची पिछेहाट झाली. त्यामुळे या गटात महाविकास आघाडीला आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सोपी नाही.
यापूर्वी टाकळी ढोकेश्वर व ढवळपूरी पंचायत समिती गणातून शिवसेनेचे उमेदवार विजयी झालेले आहेत. हीच पार्श्वभूमी लक्ष घेता आता पुन्हा या भागातील स्थानिक विकासाचे मुद्दे निवडणुकीच्या अग्रस्थानी असतील. त्यातच भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपासून पारनेर तालुक्यात विशेष लक्ष घातलेले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत गाफील असलेले महाविकास आघाडीचे नेते खासदार निलेश लंके आणि त्यांचे दुसऱ्या – तिसऱ्या फळीतील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सावध झाले आहेत. मात्र, आता विद्यमान आमदार काशिनाथ दाते हे महाविकास आघाडीचे नेते, खासदार निलेश लंके आणि त्यांच्या प्रतिष्ठानच्या यंत्रणेच्या विरोधात संघर्षात उतरलेले असल्याने होणारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक गाजणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
राजकीय संघर्षाची चिन्हे..
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठे राजकीय ध्रुरवीकरण झाले. काशिनाथ दाते आमदार झाल्याने खासदार निलेश लंके यांच्या विरोधाकांना राजकीय बळ मिळाले. त्यातच आता संघर्षासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची यंत्रणा पाठिशी असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीत राजकीय संघर्ष पाहावयास मिळणार असून महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा राजकीय अस्तित्वासाठी कस लागणार आहे.
जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक गाजणार, टाकळीढोकेश्वर, ढवळपूरी जिल्हा परिषद गट ; सत्ताधारी-विरोधकांकडून मोर्चेबांधणी

0Share
Leave a reply