Disha Shakti

अपघात

वाळू वाहतूक करणारी विनाक्रमांक पिकअप पलट्या खात चढली थेट दुभाजकावर

Spread the love

संगमनेर प्रतिनिधी / धनेश कबाडे : अवैध वाळू वाहतूक करणारी पिकअप थेट दुभाजकावर चढली आहे. ही घटना शनिवार दिनांक 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. मात्र आता यावरून अवैध वाळू वाहतुकीकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष असल्याचे पाहावयास मिळत आहे. संगमनेर येथील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा सुरूच आहे. दिवसाढवळ्या वाळू काढली जात आहे. शनिवारी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास खांडगाव फाटा येथे विनाक्रमांक पिकअप पलट्या खात थेट दुभाजकावर चढली. यावेळी पिकअपमध्ये वाळू काढण्यासाठी लागणारे खोरे देखील होते. पिकअप दुभाजकावर चढल्याचे समजताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. तर वाळूतस्करांची पिकअप काढण्यासाठी चांगलीच धावपळ सुरू होती. दरम्यान दैव बलवत्तर असल्याने पिकअपमधील सर्वजण बालंबाल बचावले आहेत.

दरम्यान, प्रवरा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू काढली जात आहे. मात्र याकडे महसूल विभागाचे अधिकारी का दुर्लक्ष करत आहेत? असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महसूल विभागाच्या कारवाया थंड झाल्याचे दिसून येत आहे. याचबरोबर घारगाव येथील मुळा नदीपात्रातून देखील अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. तर अकलापूर परिसरातील शेळकेवाडी याही ठिकाणी रात्रीच्यावेळी चोरटी वाहतूक होत आहे. सध्या महसूल विभागाचे अवैध वाळू वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. याचाच फायदा वाळूतस्करांनी उचलला आहे. यामुळे आता तालुक्यात सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक कधी बंद होणार आहे असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!