Disha Shakti

इतर

संगमनेरच्या पठारभागात अवैध धंदे जोमात ; ढाब्यांवर खुलेआम दारुविक्री तर मटका जोरात सुरू पोलिसांचे दुर्लक्ष

Spread the love

विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीतील काही गावांमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली आहे. तर दुसरीकडे खुलेआम अवैध धंदे देखील सुरू आहेत. अनेक ढाब्यांवर दारुविक्री होत असून दिवसाढवळ्या बोटा परिसरात मटकाही सुरू आहे. मात्र असे असताना घारगाव पोलीस याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याने वातावरण बिघडत चालले आहे. त्यामुळे घारगाव पोलिसांच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

पूर्वी घारगाव येथे पोलीस चौकीच होती. त्यावेळी अवघे दोन ते तीनच पोलीस कर्मचारी संपूर्ण पठारभाग सांभाळत होते आणि त्यांचा धाकही होता. यामुळे फार कमी प्रमाणात गुन्हे घडत होते. मात्र आता तसे राहिले नाही. पोलीस ठाणे होऊन दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत चालला आहे. कारण पोलिसांचा वचकच राहिला नसल्याने सातत्याने विविध घटना घडत असतात, त्यातच आता चोर्‍यांचे प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास देखील लागला नाही. सध्या पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गावांमध्ये किंवा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ढाब्यांवर खुलेआम दारुची विक्री होत आहे. पण याकडे पोलीस लक्ष देत नसल्याने विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.

याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून बोटा येथे दिवसाढवळ्या मटका सुरू आहे. याबाबत घारगाव पोलिसांना माहीत असतानाही कारवाई केली जात नाही. साकूर परिसरातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पण तेरी भी चूप मेरी भी चूप अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याचे दिसून येत आहे. घारगाव येथे महामार्गाच्या कडेला अनेक चायनिजच्या टपर्‍या असून खुलेआम दारु पिण्यासाठी लोक बसत आहेत. पोलिसांना माहीत असताना देखील पोलीस कारवाई करत नाहीत. यामुळे पठारभाग अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू बनला आहे. यासाठी घारगाव पोलीस ठाण्याला खर्‍याअर्थाने खमक्या पोलीस निरीक्षकाची गरज आहे. तेव्हाच वाढलेल्या गुन्हेगारीला कुठेतरी आळा बसेल.

सध्या पठारभाग हा अवैध धंद्यांचे केंद्रबिंदू बनला आहे. कारण खुलेआम अवैध दारुविक्री, मटका, गुटखा, चोरटी वाळू वाहतूक हे सर्व अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. या सर्व बाबी पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू आहेत.यामुळे पठारभागात अवैध धंद्यांना पोलिसांकडून पाठबळ मिळत असल्याने त्यांचे चांगलेच फावले आहे. याकडे खर्‍याअर्थाने जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हाच अवैध धंदे बंद होतील.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!