श्रीरामपूर विशेष प्रतिनीधी / इनायत अत्तार : आदर्शगाव जाफराबाद येथे प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमधील व्यावसायिक कौशल्याला वाव मिळावा, तसेच भविष्यातील व्यावसायिक संधींची जाणीव व्हावी या हेतूने शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचाच भाग म्हणून शाळेमध्ये शनिवार,दि.०४ जानेवारी २०२५ रोजी बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.गावच्या लोक नियुक्त सरपंच सौ.शारदा संदिप शेलार यांच्या हस्ते बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.
या मेळाव्यात शाळेतील इ.१ ली ते ४ थी च्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खाद्यपदार्थां व भाजीपाला विक्री केंद्र उभारली होती. उपस्थित विद्यार्थ्यांनी व पालकांनी पदार्थ विकत घेऊन मनसोक्त आनंद लुटला. स्टाँलवरील पदार्थ विक्री, जाहिरात, सादरीकरण याबाबत चा नाविन्यपूर्ण आगळावेगळा अनुभव घेतांना विद्यार्थ्यांना वेगळी अनुभूती अनुभवायला आली. पाणीपुरी, भेळ, भजी , शिरा, ठेचा भाकर, पोहे, चाँकलेट, चायनीज पदार्थ, वडापाव , केक असे वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या व पालकांच्या मदतीने स्वतः बनवले होते. आपण केलेले पदार्थ विकताना त्यांना वेगळाच आनंद मिळत होता.
या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण व्यवहार तसेच स्वतः केलेल्या कामाचा आनंद प्रत्यक्ष व सहज घेता आला. काही अनुभव हे पुस्तकांपेक्षा प्रात्यक्षिकातून उत्कृष्ट रितीने दिले जातात. त्यातील हा आनंद मेळावा हे उत्कृष्ट उदाहरण होय. बालमेळावा यशश्वी होनेकामी शाळेचे मुख्याध्यापक श्री.एकनाथ रहाटे, शिक्षिका श्रीम. सविता रुपनर श्रीम.पुष्पा गायकवाड यांनी परीश्रम घेतले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ आणि पालकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी शाळेच्या या जीवन व्यवहार समृद्ध करणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले .
‘विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा रूजवण्यासाठी व स्वकमाईची जाणीव होण्यासह या उपक्रमाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध व्यवसाय व प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी हा आनंदमेळावा आयोजित केला असल्याचे सरपंच सौ.शारदा शेलार यांनी प्रास्ताविकातून सांगितले. मुख्याध्यापक श्री.एकनाथ रहाटे यांनी बालव्यवसायीकांचा परिचय करून देत आयोजित बालमेळाव्याच्या यशस्वी आयोजन नियोजनात सहभागी सर्वांचे आभार मानले . सहाय्यक शिक्षिका श्रीम.पुष्पा गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले.
Leave a reply