Disha Shakti

इतर

डोंगरगण येथे ग्रामस्थांचा रास्ता रोको ; डांबर न टाकताच रस्त्याचे खडीकरण, रस्ता कोणत्या निधीतून किती अंतरापर्यंत होणार याचे स्पष्टीकरण नाही

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर.आर. जाधव : वांबोरीसह डोंगरगण व परिसरातील गावांना जिल्ह्याच्या ठिकाणी जोडणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्गाची डोंगरगण येथे दुरावस्था झाली आहे. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून डोंगरगण फाटा पासून पुढे खडीकरणाचे काम सुरू आहे. हे काम करताना कॉम्प्रेसर ने धूळ बाजूला काढण्यात आली नाही तसेच डांबरही टाकण्यात आले नाही. केवळ खडी टाकून काम करण्यात येत होते. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीनच्या सुमारास वांबोरी नगर रस्ता डोंगरगण येथे अडवला. यावेळी माजी सरपंच कैलास पटारे, उपसरपंच संतोष पटारे, संजय पटारे, साहेबराव कदम, संतोष मते आदी उपस्थित होते.

निकृष्ट काम होत असल्याचे शाखा अभियंता सुजाता तुपे यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच डांबर न टाकताच पसरवलेली सर्व खडी गोळा करून पुन्हा कम करण्याची मागणी लावून धरली. तसेच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या देखरेखीवर नियमित यावे या मुद्द्याकडेही लक्ष वेधले. त्यावर अभियंता तुपे यांनी मागणी मान्य करत काम चांगले करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. हा रस्ता कोणत्या निधीतून किती अंतरापर्यंत होत आहे, याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. पुन्हा खडीचे अस्तरीकरण करण्याची मागणी डोंगरगण रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. खाली डांबर न टाकताच, खडीचे आच्छादन टाकण्यात आले. त्यामुळे आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आल्याचे आंदोलक कैलास पटारे यांनी सांगितले. या कामावर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियमित भेट देऊन काम दर्जेदार करण्याची मागणी केली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!