राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : बालवयापासून व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणाबरोबरच बाह्यज्ञानाचा अंतर्भाव अंगीकारणे गरजेचे असून शाळांमधून जाणीवपूर्वक घेतले जात असलेले आनंद बाजार सारखे प्रयोग चिमुकल्यांना त्यांच्या व्यवहारीक ज्ञानात निश्चितच भर घालण्यासाठी पुरक असून, यातून त्यांच्यातल्या कलागुणांचा अधिकाधिक विकास होण्यासाठी हातभार लावतील असा सूर तालुक्यातील चिंचोलीच्या भटारकरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी भरविलेल्या आनंद बाजार प्रसंगी पालकांनी व्यक्त केला.
चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील व्यावहारिक ज्ञान विकसित व्हावे हा दृष्टीकोन ठेवत शनिवार ४ जानेवारी रोजी भटारकरवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांनी चिमुकल्यांचा आनंद बाजार कार्यक्रम आयोजित केला होता. प्रसंगी चिमुकल्यांनी आपापल्या बुध्दी कौशल्यानुसार विविध खाद्यपदार्थांबरोबरच शेतातील अनेकविध भाजीपाला, फळे, तयार पदार्थ कांदा पोहे, ढोकळा, चना चटपट, शेव, पाणीपुरी, भेळीपासून ते लसूण चटणी, हिरवा ठेचा यांचे स्टाॅल लावले होते. बाजारात आपल्याकडील माल विकण्यासाठी व्यापारी करीत असलेले विविध फंडे या चिमुकल्यांनी प्रसंगी वापरल्याचे पहावयास मिळत होते.
ग्रामस्थांनीही या चिमुकल्यांच्या आनंद बाजारचा मनसोक्त आनंद लुटत त्यांच्याकडील वस्तूंच्या खरेदीला भरभरून प्रतिसाद देत. तोंडभरून कौतुक केले. या बाजारासाठी येथील महिलांची उपस्थिती लक्षणीय ठरली.
सकाळपासून सुरू असलेला हा बाजार दुपारपर्यंत सुरूच होता. भटारकरवस्ती शाळा ही तालुक्यातील एक आदर्श शाळा ठरली असून पुर्वीपासून ही केंद्र शाळा आहे. शाळेतील बगीचा, खेळण्यासाठीचे विविध साहित्य पायाभूत सर्व सुविधा, व महत्त्वाची शैक्षणिक गुणवत्ता, बरोबरच चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठीचे नवनवीन प्रयोग शाळा स्तरावर राबविले जात असल्याने परिसरातील बहुतेक सर्वच पालकांचा ओढा आपल्या पाल्यांच्या प्राथमिक शिक्षणासाठी या शाळेकडे राहिला आहे.प्रसंगी साई बाळासाहेब खपके, काव्या देविदास थोरात, श्रध्दा प्रविण कोळसे, समृद्धी संदीप केळकर, तनुजा संतोष नलगे, शिवंण्या रविंद्र नलगे, स्वरूप संतोष काळे यासह चिमुकल्यांच्या अनोख्या स्टाॅलने सर्वांचेच लक्ष वेधले शिक्षण विस्तार अधिकारी इंदुमती धट यांनी भेट देत चिमुकल्यांचे कौतुक केले.आनंद बाजार च्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वाल्मिक हारदे, उपाध्यक्ष दत्तात्रय काळे, मुख्याध्यापक शंकर गाडेकर, उपाध्यापिका श्रीमती मीनाक्षी पाळंदे, श्री हौशिनाथ सजन, संजय बोकंद, श्रीमती निला कडाळे, सचिन पारेकर, श्रीमती सुरेखा भाकरे, वंदना कोरूलकर, श्रीमती अंजली वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
Leave a reply