Disha Shakti

क्राईम

राहुरी तालुक्यातील आरडगाव परिसरात मुळा नदीपात्रात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह ; मागील दोन अनोळखी मृतदेहाची ओळख न पाटण्याआधीच आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ

Spread the love

राहुरी प्रतिनिधी / आर. आर. जाधव : राहुरी तालुका पोलीस ठाणे हद्दीत मृतदेह सापडण्याचे सत्र सुरूच आहे. आज दि. ७ जानेवारी रोजी सकाळच्या दरम्यान तालुक्यातील आरडगाव परिसरात सकाळी मुळा नदीपात्रात पुन्हा एक अनोळखी इसमाचा मृतदेह फूगलेल्या अवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

राहुरी तालुक्यातील आरडगाव येथील स्मशानभूमी जवळील मुळा नदीपात्रात आज दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान सुमारे ३५ वर्षीय तरुणाचा मृतदेह नदीपात्रात पाण्यावर तरंगताना दिसून आला. स्थानिक नागरीकांनी पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, हवालदार प्रवीण खंडागळे, संभाजी बडे, रोहित पालवे, चालक शकुर सय्यद आदि पोलिस पथक तसेच सरपंच रविंद्र म्हसे, पोलिस पाटील लक्ष्मण जाधव यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक तरुण व रुगणवाहिचा चालक सचिन धसाळ यांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातील पाण्यातून बाहेर काढला. मृतदेह पाण्यात राहिल्यामुळे पूर्णपणे फुगलेल्या अवस्थेत असून मृतदेहाची ओळख अद्याप पटली नाही.

राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुर येथे सुमारे सहा महिन्यापूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह हाथपाय बांधून एका छोट्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. तर गेल्या पंधरा दिवसापूर्वी राहुरी देसवंडी शिव परिसरात मुळा नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळून आला होता. बारागाव नांदुर व राहुरी देसवंडी शिव परिसरात आढळून आलेल्या दोन्ही मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने दोन्ही तपासाला खीळ बसली. आज पून्हा एक मृतदेह आढळून आल्याने तालूक्यात मृतदेह सापडण्याचे सत्रच सुरु असल्याची चर्चा परिसरात सुरु आहे. मात्र या घटनेमुळे तालुक्यात पून्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!