श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव-पुणतांबा रस्त्यावर अवैधपणे गांजाची वाहतूक करणार्या दोन जणांकडून 3 लाख 52 हजार 600 रुपये किंमतीचा 35.26 किलो गांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाई तालुका पोलीस व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. तालुका पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांना दोन इसम पिकअप (क्र.एमएच 43 एडी 8218) मध्ये गांजा सदृश अंमली पदार्थ घेवून मध्यप्रदेशकडून कोपरगाव-पुणतांबा मार्गे श्रीरामपूरला येत असल्याची गुप्त माहीती मिळाली.
मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, पोलीस उप-निरिक्षक संदिप मुरकुटे, सहाय्यक फौजदार सतिष गोरे, पोलीस-हेड-कॉन्स्टेबल राजेंद्र लवांडे, प्रशांत रणनवरे, साजीद पठाण, श्रीकांत वाबळे, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, पोलीस नाईक सचिन धनाड यांचे पथक गोंडेगाव-पुणतांबा रोडने गोंडेगाव येथे दिपक कदम यांच्या पत्र्याच्या दुकानाजवळ सापळा लावून थांबले असता, पुणतांब्याकडून श्रीरामपूरकडे वरील वर्णनाचा पिकअप येताना दिसला. पथकाची खात्री होताच त्यांनी सदर चारचाकी पिकअप चालकास रस्त्याच्या कडेला थांबण्यास सांगितले.
पिकअप मधील दोन संशयितांची विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिली.परंतू त्यास पोलीसी खाक्या दाखवून विचारपुस केली असता त्यांनी अन्वर एजाज शहा (वय 42, रा.बीफ मार्केटजवळ वॉर्ड नं. 2 श्रीरामपूर), तरुण बाबुलाल पावरा (वय 32, रा. जामजिरा ता. शिरपुर जि. धुळे) असे सांगितले. पंचासमक्ष पिकअप वाहनाची झडती घेतली 35.26 कि.ग्रॅ. गांजा सदृश अमंली पदार्थ मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याकडून 10 हजार रुपयाचे दोन मोबाईल, 4 लाख रुपये किंमतीचा एक महिंद्र पिकअप, 3 लाख 52 हजार 600 रुपयाचा 35.26 कि.ग्रॅ. वजनाचा गांजा सदृश अमंली पदार्थ असा मुद्देमाल जप्त करुन दोन जणांना ताब्यात घेतले.
याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत जर्नादन रणनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परीणाम करणारा पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 20 (इ) (2) (उ) व 22(क) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Leave a reply