Disha Shakti

इतर

मैलारपूर येथे श्री खंडोबाची यात्रा १२ ते १४ जानेवारी दरम्यान भरणार

Spread the love

दिशाशक्ती प्रतिनिधी / चंद्रकांत हगलगुंडे : महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मैलारपूर (नळदुर्ग) येथील श्री खंडोबाच्या वार्षिक यात्रा महोत्सवास १२ जानेवारी (रविवार) रोजी प्रारंभ होत आहे. या यात्रोत्सवादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यात्रेची जय्यत पूर्वतयारी सुरू आहे. या महायात्रेस किमान पाच लाख भाविक हजेरी लावतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

श्री खंडोबा हे महादेवाचे अवतार असून महाराष्ट्रात श्री खंडोबाची एकूण आठ प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील मैलारपूर (नळदुर्ग) हे दुसरे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. नळ राजाची पत्नी दमयंती हिच्या भक्तीमुळे श्री खंडोबा नळदुर्गात प्रकट झाले. तसेच दमयंती राणीच्या भक्तीमुळे श्री खंडोबाने बाणाईस चंदनपूराहून नळदुर्गात आणून विवाह केला व नंतर जेजुरीकडे प्रस्थान केले, अशी आख्यायिका आहे.

श्री खंडोबाची अणदूर आणि नळदुर्गमध्ये दोन वेगवेगळी मंदिरे असून मूर्ती मात्र एकच आहे. अणदूरमध्ये सव्वा दहा महिने व नळदुर्गमध्ये पावणेदोन महिने श्री खंडोबाची मूर्ती ठेवण्याची परंपरा हजारो वर्षांपासून सुरू आहे. अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यात देवाचा करार केला जातो. देवाचा करार करण्याची प्रथा महाराष्ट्रात फक्त या ठिकाणी चालते, हे विशेष.

मूर्ती अणदूर येथून नळदुर्गला आणल्यानंतर यात्रोत्सव सुरू होतो. दर रविवारी भाविक भक्त देवाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. त्यास खेटे असे संबोधले जाते. पौष पौर्णिमा महायात्रा संपल्यानंतर अष्टमी करून नवमीला मूर्ती अणदूरला नेण्यात येते.

१३ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस

नळदुर्गची महायात्रा पौष पौर्णिमेला भरते. महायात्रा १२ जानेवारी रोजी सुरू होणार असून, १३ जानेवारी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. सोमवारी (दि. १३) पहाटे ४ वाजता काकडा आरती झाल्यानंतर श्री खंडोबाच्या मूर्तीवर अभिषेक करून अभ्यंगस्नान घालण्यात येणार आहे. त्यानंतर महावस्त्र अलंकार पूजा करून महानैवेद्य दाखविण्यात येणार आहे. दिवसभर भंडारा व खोबरे उधळणे, विविध गावाहून आलेल्या नंदीध्वजाची मिरवणूक, लहान मुलांचे जावळ काढणे, तळी भांडार उचलणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. रात्री १२ वाजता अणदूर आणि नळदुर्गच्या मानाच्या काठ्यांचे व अणदूरहून आलेल्या घोड्यांचे आगमन होणार आहे. याचवेळी रंगीबेरंगी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात येणार आहे. मध्यरात्री २ वाजता मंदिरात अणदूर व नळदुर्गच्या मानकऱ्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर पहाटे ३ वाजता श्रीची छबिना मिरवणूक निघणार आहे. मंगळवारी (दि. १४) दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता जंगी कुस्ती स्पर्धा होऊन यात्रेची सांगता होणार आहे.

यात्रेची जय्यत तयारी सुरू

यात्रेनिमित्त श्री खंडोबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून, भाविकांना रांगेत दर्शन घेता यावे यासाठी दर्शन बारी तयार करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच यात्रा शांततेत आणि सुरळीत पार पडण्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.मैलारपूर (नळदुर्ग) येथे होणारी श्री खंडोबाची यात्रा १२ ते १४ जानेवारी दरम्यान भरणार आहे. यात्रेचा मुख्य दिवस १३ जानेवारी असून, त्या दिवशी धार्मिक उत्सवाला विशेष महत्त्व असणार आहे. या यात्रेमुळे महाराष्ट्रातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

१३ जानेवारी रोजी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री छबिना निघणार असून, त्यावेळी गावोगावच्या ७०० ते ८०० नंदीध्वज (काठ्या) रोषणाई करून सजवून दाखल होणार आहेत. रात्री १२ वाजताच्या सुमारास अणदूर आणि नळदुर्गच्या मुख्य काठ्यांचे आगमन होईल. यावेळी शोभेचे दारूकाम भाविकांचे आकर्षण ठरणार आहे.

पाच लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती अपेक्षित

या यात्रेत तीन दिवसांत सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने कडक नियोजन केले आहे.

शांतता कमिटीची बैठक : अवैध धंद्यांवर आणि अनुचित प्रकारांवर कारवाईची मागणी

मंगळवारी शांतता कमिटीची बैठक झाली. या बैठकीत दोन्ही गावांचे मानकरी, पोलीस अधिकारी आणि पुजारी उपस्थित होते. यात्रेत शांतता राखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या.

या बैठकीत पुढील मुद्द्यांवर चर्चा झाली:

1. अवैध धंदे बंद करणे – यात्रेदरम्यान गावठी दारू विक्री होत असल्याची तक्रार होती, त्यामुळे ती तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली.

2. हळदीच्या नावाखाली पिवडी विक्रीवर बंदी – यात्रेत हळदीऐवजी पिवळा रंग विकला जातो. त्यावरही कारवाईची मागणी झाली.

3. अनधिकृत पाळणे बंद करणे – यात्रेत बेकायदेशीर पाळणे उभारून आर्थिक लूट केली जाते. यावर तहसील, पोलीस आणि नगर परिषद यांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

4. गुंडगिरीला आळा घालण्याचे आदेश – यात्रेत काही लोकांकडून सुरू असलेली गुंडगिरी थांबवून त्यावर कडक कारवाई करावी, अशी विनंती मानकऱ्यांनी केली. श्री खंडोबा यात्रेत गुंडगिरी करून कुणी पैश्याची मागणी करीत असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

भाविकांसाठी आवाहन
यात्रा शांततेत पार पडावी, भाविकांनी संयम राखावा आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहन शांतता कमिटीने केले आहे. श्री खंडोबाच्या कृपाशीर्वादाने यात्रा यशस्वी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!