Disha Shakti

Uncategorized

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या स्टॉलला बारामती येथील कृषिक 2025 प्रदर्शनात शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद

Spread the love

राहुरी विद्यापीठ, / आर.आर.जाधव : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठाने बारामती येथील कृषिक-2025 प्रदर्शनात सहभाग घेऊन काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रकल्पाने तयार केलेले नाविन्यपूर्ण अविष्कार प्रदर्शित केले असून या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कृषि विद्यापीठाच्या या प्रदर्शन स्टॉलला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजित पवार, कृषिमंत्री मा.ना.अॅड. माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री मा.ना. पंकजा मुंडे, मा.आ.श्री. रोहित पवार आणि विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. विद्यापीठाने या प्रदर्शनात ड्रोन व दूरस्थपणे चालणारा फवारणी फुले रोबोट, हायपरस्पेक्टरल इमेजिंगचा शेतीसाठी वापर, फुले स्मार्ट हवामान केंद्र,आयोटी सक्षम मृद ओलावा संवेदक आणि फुले मृदा ओलावा संवेदक आधारित सिंचन वेळापत्रक प्रणाली या तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता.

यावेळी काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स सहप्रमुख संशोधक तथा सहयोगी प्राध्यापक डॉ. सोमनाथ माने, डॉ. वैभव माळुंजकर, डॉ. गिरीशकुमार भणगे, इंजि. निलकंठ मोरे, श्री. सौरभ भडांगे, श्री. अजिंक्य आढाव आणि श्री. प्रशांत पानसंबळ यांनी मान्यवरांना व उपस्थित शेतकर्यांना तंत्रज्ञानाबद्दल माहिती दिली.

सदर प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे आणि कृषि अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख तथा काटेकर शेतीसाठी डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित सेंटर ऑफ एक्सलन्स प्रमुख संशोधक डॉ. सुनील कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रदर्शनाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!