राहुरी ग्रामीण प्रतिनिधी / सुभाष गुलदगड : राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेत सरपंच पतीने ग्रामसभेत ढवळाढवळ करून ग्रामसभा उधळून लावली. यावेळी प्रचंड गदारोळ झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे सरपंच व सरपंच पती विरोधात तक्रार केली आहे. म्हैसगाव येथील ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले, २६ जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील म्हैसगावची ग्रामसभा सरपंच सुजाता अरुण पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. म्हैसगाव ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामे, घरकुल, रस्ते व आरोग्याबाबतचे प्रश्न मांडण्यासाठी ग्रामस्थ ग्रामसभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी प्रश्न मांडताच सरपंच पती अरुण पवार यांनी उपस्थित ग्रामस्थांना हुकूमशाही व दादागिरी केली. तसेच सरपंच व
ग्रामसेवक यांना ग्रामसभेतून उठून जाण्यासाठी भाग पाडले आणि सदर ग्रामसभा उधळून लावली. सरपंच पती अरुण पवार हे ग्रामसेवकांना चुकीची माहिती देऊन प्रत्येक कामात नेहमी अडथळे निर्माण करत आहेत. त्यांनी पूर्ण गावाला वेठीस धरले आहे. ‘मी जे सांगेन तेच होणार. तुम्हाला काय करायचे ते करा’ अशी दादागिरी करत आहेत. उपसरपंच व सदस्य यांना मासिक सभेमध्ये नेहमीच अडथळा निर्माण करत आहे. गावातील अनेक कामे बंद पाडली. सरपंच, सरपंच पती व ग्रामसेवक हे संगनमताने वागतात. कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांना व उपसरपंचांना विचारात घेत नाहीत. नागरिकांचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत. गावात व ठाकरवाडीमध्ये पाण्याची व दिवाबत्तीची खुप वाईट अवस्था झाली आहे. सरपंच सुजाता पवार व त्यांचे पती अरुण पवार यांच्या मनमानीला ग्रामस्थ पूर्णपणे कंटाळले आहेत. पुढील ग्रामसभेसाठी पंचायत समितीचे बिडीओ व तहसीलदार यांनी उपस्थित राहावे. लोकशाही राजवटीत महिला सरपंच असताना व ग्रामपंचायतीच्या कारभारात सरपंचपतीने ढवळाढवळ करू नये. सरपंच सुजाता पवार यांचे सरपंचपद अपात्र करण्याबाबत तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आली.
म्हैसगावच्या महिला सरपंच व पतीची ग्रामसभेत दादागिरी ; अपात्रतेची कारवाई करण्याची नागरिकांची गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी

0Share
Leave a reply