राहुरी प्रतिनीधी / आर. आर. जाधव : काही वर्षांपूर्वी बसस्थानक परिसरातील सुरक्षितता, नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून पोलिस चौकी उभारली. परंतु संबंधित पोलिस चौकी गेल्या अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. पोलिस चौकीला अतिक्रमण धारकांनी पुर्णपणे वेढले आहे. त्यामुळे केवळ शोभेचे बाहुले बनलेली पोलिस चौकी तर दुसरीकडे पोलिस प्रशासनाचे अवैध कृत्यांकडे होणारे दुर्लक्ष सर्वसामान्यांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरत आहे. राहुरी बस्थानक परिसर म्हणजे अवैध धंदे करणाऱ्यांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे.
बसस्थानकासह लगतच्या परिसरात नको ते हातवारे करीत बसणाऱ्या ‘त्या’ महिलांमुळे सर्वसामान्यांची कुचंबना होत आहे. बसस्थानक समोरील भागातील एका हॉटेलमध्ये दिवसाढवळ्या नको ते चाळे करणाऱ्यांसाठी मोकळीक दिली जात असल्याने परिसरात कामकाजासाठी येणारे सर्वसामान्य नागरीकांसह महिलांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे.राहुरी बसस्थानक इमारतीचे कामकाज सुरू आहे. पत्र्याचे शेड उभारत छोट्या जागेत बस गाड्यांची वाट पाहत प्रवाशी उभे असतात. तर बस प्रवेश करणाऱ्या जागेलगतच काही महिलांनी ताबा घेत हातवारे सुरू केल्याचे चित्र आहे. काही आंबट शौकिन परिसरात दाखल होत महिलांच्या इशाऱ्याला प्रतिसाद देतात. संबंधित महिला व पुरुष नको ते कृत्य करण्यासाठी बसस्थान समोरील एका नित्याच्या लॉजमध्ये जात आसरा घेतात, संबंधित लॉज लगतच राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम, रुग्णालय, मेडिकल व हॉटेल असल्याने संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. महिला, तरुणी, विद्यार्थ्यांसह अनेक सर्वसामान्यांना संबंधित ठिकाणी त्रास सहन करावा लागतो.
त्या पोलिस चौकीचा उपयोग काय?
राहुरी बसस्थानक आवारात सुरू केलेली पोलिस चौकी अनेक वर्षांपासून बंद आहे. बंद पडलेल्या पोलिस चौकीला अतिक्रमण धारकांनी वेढले आहे. चौकीत पोलिस थांबतच नसल्याने नगर-मनमाड रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. तसेच परिसरातही अवैध धंदे करणाऱ्यांचे फावले जात आहे.
राहुरीत अवैध धंद्यांची चलती
राहुरी परिसरात काही दिवसांपासून राजरोसपणे अवैध धंदे करणार्याची संख्या वाढली आहे. मटका, जुगार, गुटखा मावा विक्री, वाळू-मुरुम तस्करी, नगर मनमाड रस्त्यावरील विविध ढाब्यावर नको ते धंदे, कुंटण खाणे यासह विविध अवैध धंद्यांमध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. चोरी, लुटमार, दुचाकी चोरी तसेच विविध गुन्ह्यांच्या घटनांमध्ये होणारी वाढ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरणारी आहे.संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच संबंधित लॉज चालकालाही असे कृत्य करू नको म्हणून समजावले. परंतु लॉज चालकाने आम्ही ज्याचे त्याचे देणे देतो, म्हणून आम्हाला कोणतीही अडचण येत नसल्याचे सांगत तक्रारदाराची बोळवण केली. पोलिस प्रशासनाकडून न होणारी कारवाई तर खुलेआम अवैध कृत्य करूनही कोणीही हटकत नसल्याने राहुरी बसस्थानक परिसरामध्ये अवैध धंद्याचा प्रकार वाढतच चालले आहे
राहुरी बसस्थानक परिसर बनलाय अवैध धंद्यांचा अड्डा ; बंद पोलिस चौकी बनली केवळ शोभेची बाहुली

0Share
Leave a reply