Disha Shakti

क्राईम

जामखेड मध्ये मध्यरात्री महिलेने आवाज दिला…. ‘ताई दार उघड’ अन् दरवाजा उघडताच घरात पडला दरोडा

Spread the love

जिल्हा प्रतिनिधी / वसंत रांधवण : जामखेड शहरा जवळ असलेल्या साकत फाट्याजवळील एका घरावर बुधवार दि. 26 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका महिलेस सात ते आठ दरोडेखोरांनी चाकुचा धाक दाखवून घरात दरोडा टाकला. यात सोन्याच्या दागिनेसह रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली. विषेश म्हणजे या दरोड्यात एका महिलेचा समावेश आहे. दरोड्याच्या घटनेने जामखेड शहरासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जामखेड शहरापासून 2 किलोमीटर अंतरावरील बीड रोड येथील साकत फाट्याजवळ फिर्यादी महिला प्रतिक्षा शंकर रोकडे (वय 19) ही आपल्या कुंटूंबासमवेत राहते. बुधवार दि. 26 रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास एका महिला दरोडेखोरासह सात ते आठ दरोडेखोर आले. यावेळी सोबत असलेल्या दरोडेखोर महिलेने फिर्यादी यांचे दार वाजवत आवाज दिला की ताई दार उघड, त्यामुळे फिर्यादी महिलेस आपलेच कोणी आले आहे का अशी समजुत झाली त्यामुळे फिर्यादी महिलेने दार उघडले. घराचे दार उघडताच घरामध्ये स्कार्फ बांधलेल्या महिलेसह चोरटे आत शिरले. यानंतर चोरट्यांनी महिलेच्या घरातील सामानाची उचकापाचक केली व घरामध्ये धुमाकूळ घातला. तसेच चोरट्यांनी फिर्यादी महिलेस चाकुचा धाक दाखवून सोने व रोख रक्कम चोरली.

यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चावरच्या मजल्यावर राहत असलेल्या गायत्री किसन जाडकर यांच्या घराकडे वळवला. यावेळी घराला कुलुप असल्याने चोरट्यांनी दार तोडुन घरातील रोख रक्कम व सोने चोरून नेले. अशा प्रकारे दोन्ही घरातील एकुण दोन लाख 51 हजार रुपयांचे आठ तोळे सोन्याचे दागिने व 71 हजार 759 रूपये रोख असा एकुण 3 लाख 22 हजार 750 रूपयांचा ऐवज लंपास केला.

या घटनेत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. दरोडा पडला असल्याची माहिती फिर्यादी यांनी फोनवरून जामखेड पोलीसांना दिली. यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी आले. मात्र तोपर्यंत दरोडेखोर पळुन गेले. घटनास्थळी सकाळी पोलीस अधीक्षक राकेश ओला पोलीस उपअधीक्षक प्रशांत खैरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, जामखेड पोलीस ठाण्याचे सपोनि सोनवलकर, सपोनि वर्षा जाधव व जामखेड व अहिल्यानगरचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने भेट दिली.

या प्रकरणी एका महिलेसह एकुण सात ते आठ दरोडेखोरांवर जामखेड पोलीस ठाण्याला दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि वर्षा जाधव या करत आहेत.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!