Disha Shakti

इतर

टाकळी ढोकेश्वरमध्ये राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा, ग्राहकांना व्यवहारासाठी प्रचंड मनस्ताप

Spread the love

पारनेर विशेष प्रतिनिधी / वसंत रांधवण : तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर हे एक अहिल्यानगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील मोठी बाजारपेठ असणारे गाव आहे. या ठिकाणाहून आसपासच्या दहा ते पंधरा खेडेगावातील लोकांचा दररोज काही ना काही कामानिमित्त राबता असतो. या ठिकाणी एकच राष्ट्रीयकृत बँकेची एकच शाखा असल्याने व्यावहारिकदृष्ट्या अडचणी येत आहेत.या ठिकाणी नवोदय विद्यालय, कॉलेज, जिल्हा परिषद शाळा, अनेक शासकीय कार्यालये, व्यापारी व इतर ग्राहकांची, शिक्षकांची व इतर नोकरदारांचे बऱ्यापैकी सर्व व्यवहार हे भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतूनच चालतात. या ठिकाणी दुसरी फक्त एकमेव अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा आहे. पण राष्ट्रीयकृत नाही. यामुळे व्यवहारासाठी प्रचंड अडचण येते.

शेतकरी, विद्यार्थी, व्यवसायिक व इतर क्षेत्रातील लोकांची या बँकेकडे कर्जाची मोठी मागणी असते, पण याठिकाणी ग्राहकांची प्रचंड मोठी संख्या इतर दैनंदिन व्यवहाराबरोबरच सोने तारण, पीक कर्ज वाटप, शैक्षणिक कर्ज, गृह, वाहन, डेव्हलपमेंटसाठी कर्ज मागणी करणाऱ्यांची प्रचंड ओढा याच बँकेकडे यामुळे याठिकाणी सर्व सामान्यांना पाहिजे, तशी सुविधा देणे बँकेला खरेतर प्रचंड मोठा व्याप असल्याने शक्य होत नाही. मग यामधे प्रशासनाला तरी दोष देऊन काय फायदा. आसपासच्या खेडेगावासह टाकळी ढोकेश्वर येथील ग्राहकांची प्रचंड मोठी संख्या याच एकमेव राष्ट्रीयकृत बँकेकडे आहे. यामुळे चांगली व तत्पर सेवा देण्याचे मोठे आव्हान बँक प्रशासनापुढे आहे. यामुळे खरेतर ग्राहकांना मात्र मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याठिकाणी दुसऱ्या एक किंवा दोन राष्ट्रीयकृत बँकेची खरी गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची टाकळी ढोकेश्वरकरांसह परिसरातील नागरिकांची ही मागणी आहे. पण कोणीही याकडे लक्षच देत नाही.

टाकळी ढोकेश्वरकरांची शोकांतिका

लोकप्रतिनिधींनी याठिकाणच्या मागणीकडे लक्ष देऊन प्रचंड अडचणीचा विषय मार्गी लावणे आवश्यक आहे. पण दुर्दैवाने लोकप्रतिनिधी या महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत. हि टाकळी ढोकेश्वरांची मोठी शोकांतिका आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन हा बँकेचा प्रश्न ताबडतोब सोडविण्याची मागणी टाकळी ढोकेश्वर परीसरातील नागरिकांमधून होत आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!