राहुरी विद्यापीठ / आर आर जाधव : अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेती उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या वाढीमध्ये शेती व्यवसायाबरोबरच शेतीला दुय्यम व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, एकात्मिक शेती, विविध शेती पद्धती, सेंद्रिय शेती यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य असे मार्गदर्शन झाले पाहिजे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत. यासाठी कृषिचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या कृषिच्या पदवीधरांनी उद्योजक बनावे व शेती क्षेत्राला नवी दिशा द्यावी असे प्रतिपादन अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे ग्रामीण समृद्धीसाठी नावीन्यपूर्ण संशोधन व उद्योजकता: कृषि दृष्टिकोन या विषयावरील महाराष्ट्र सोसायटी ऑफ अग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स, अकोला व कृषि अर्थशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय परिसंवादाच्या समारोपप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, महाराष्ट्र सोसायटी ऑफ अग्रिकल्चर इकॉनॉमिक्सचे अध्यक्ष डॉ. डी. एल. साळे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. आर. जी. देशमुख, अकोला येथील सोसायटीचे कोषाध्यक्ष डॉ. एस. सी. नागपुरे, विविध कृषि विद्यापीठातील डॉ. सचिन मोटे, डॉ. तोरणे व डॉ. एन. व्ही. शेंडे उपस्थित होते.
यावेळी डॉ. गोरक्ष ससाणे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की या परिसंवादातून तयार झालेल्या शिफारशींचा फायदा कृषि व्यवसायासाठी होणार आहे. या शिफारशींमुळे कृषि व्यवसाय अधिकाधिक फायदेशीर करण्याबरोबरच उद्योजकता विकास, नाविन्यपूर्ण विपणन धोरण, मूल्यवर्धन आणि कृषि प्रक्रिया तसेच हवामान स्मार्ट शेती आणि डिजिटल शेती हे विषय शेतीसाठी महत्त्वाचे आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. आर. आर. निरगुडे यांनी या राष्ट्रीय परिसंवादाचा सारांश व निष्कर्ष सादर केला. यावेळी कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते विविध पाच थीममधील शोधनिबंधांचे सादरीकरण तसेच पोस्टर सादरीकरणांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या विद्यार्थी तसेच विभागातील शास्त्रज्ञ, कर्मचारी यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. शोधनिबंध सादरीकरणामध्ये अनुक्रमे डॉ. जे. टी. दोरगे, डॉ. गौरव शर्मा, डॉ. रचना बंसल, पी. व्ही.मुंडे, डॉ. ए. जी. आमले, डॉ. डी.जे. सानप, डॉ. संजय सपकाळ, डॉ. एस. एम. कवीभारती, डॉ. के.वाय. खैरनार, कुमारी रिया परमार यांना तर पोस्टर सादरीकरणामध्ये के. पी. पाटील, एच. व्ही. हर्षित गौडा, ऋत्विका मकवाना, डॉ. पल्लवी कोळेकर, के. एस. होरा, श्रेयस डिंगोरे, साक्षी गजभिये, एस. आर. लावण्य, आर. निधीश्री व साक्षी देऊळकर यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी महाराष्ट्र सोसायटी ऑफ अग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचे विविध स्मरणिका पुरस्कार व स्मृती पुरस्कार तसेच तज्ञ व्याख्याते यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय सपकाळ यांनी तर आभार डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी मानले.या दोन दिवसीय परिसंवादासाठी देशभरातील कृषि विद्यापीठे आणि इतर प्रमुख संस्थांमधून सुमारे 600 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि विद्यार्थी सहभागी झाले होते.
Leave a reply