राहुरी प्रतिनिधी / ज्ञानेश्वर सुरशे : राहुरी तालुक्यातील उंबरे विकास सेवा संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानात रेशनच्या साठ्यात तफावत आढळल्याने संचालक मंडळ व सेल्समन सह एकूण १५ जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राहुरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
राहुरीचे पुरवठा आधिकारी सुदर्शन केदार यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, राहुरीचे तहसिलदार यांच्या आदेशानुसार उंबरे येथील उंबरे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणी अहवालावरून संबंधित प्राधिकार पत्राशी निगडीत असलेले संचालक मंडळ व धान्य वितरणासाठी नेमलेले सेल्समन यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने उंबरे येथील उंबरे विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या स्वस्त धान्य दुकानाच्या तपासणीसाठी गेलो असता सेल्समन सचिन भाऊसाहेब वैरागर हे स्वतः हजर होते.
तपासणी दरम्यान दुकानातील पुस्तकी साठा व प्रत्यक्ष साठा याचा ताळमेळ घालण्यात आला. तसेच या संस्थेच्या दुकान क्र.१ व दुकान क्र. २ या दोन्ही धान्य दुकानांची सखोल तपासणी करून स्वतंत्र निरीक्षण टिपणी काढण्यात आली. दोन्ही दुकानांची तपासणी करीत असताना गव्हाच्या साठ्यामध्ये ५५ क्विटंलची, तांदुळाच्या साठ्यात जवळपास १०७ क्विटंलची तसेच साखर १७ किलोची तफावत आढळली. सदर दोन्ही दुकानांची टिपणी भरण्याबरोबरच तेथे हजर असलेल्या पाच पंचा समक्ष विहित नमुन्यात धान्याचा पंचनामा करण्यात आला आहे.
पुरवठा आधिकारी सुदर्शन केदार यांच्या फिर्यादीवरून राजेंद्र विश्वनाथ दुशिंग (चेअरमन), मिराबाई लक्ष्मण काळे (व्हा. चेअरमन), राजेंद्र रंगनाथ दुशिंग (सचिव), दत्तू निवृत्ती ढोकणे, शहाराम भाऊसाहेब आलवणे, चांगदेव ज्ञानदेव ढोकणे, दत्तात्रय एकनाथ ढोकणे, सुरेश किसन ढोकणे, सोपान नाथा दुशिंग, अशोक नामदेव पंडित, मच्छिंद्र नारायण ढोकणे, गयाबाई भाऊसाहेब दुशिंग, संदिप केशव ढोकणे, भाऊसाहेब बापू बाचकर (सर्व संचालक) तसेच सचीन भाऊसाहेब वैरागर (सेल्समन) अशा एकूण १५ आरोपींवर जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३ व ७ मध्ये घालून दिलेल्या अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालूक्यातील उंबरे येथे रेशनचा घोटाळा उघडकीस, सोसायटीच्या संचालक मंडळासह १५ जणांवर गुन्हा दाखल

0Share
Leave a reply