Disha Shakti

अपघात

ममदापुर परिसरातील चांडेवाडी – राजुरी रस्त्यावर दोन दुचाकीस्वारांवर बिबट्याचा प्राणघातक हल्ला, दोघे जखमी

Spread the love

श्रीरामपूर विशेष प्रतिनिधी / इनायत अत्तार : राहाता तालुक्यातील ममदापूर येथील चांडेवाडी राजुरी रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळ गुरूवारी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या दरम्यान दोन दुचाकी स्वारांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. यात चांडेवाडी येथील किसन संभाजी चांडे (वय ७५) तर गळनिंब येथील सार्थक मुक्ताजी जाटे (वय १३) हे दोघे जखमी झाले आहेत. चांडेवाडी येथील किसन संभाजी चांडे हे त्यांच्या नातवासमवेत त्यांच्या दुचाकीवरून ममदापूर गावातून चांडेवाडी येथे घरी येत असताना गुरूवारी रात्री आठ वाजेच्या दरम्यान चांडेवाडी – राजुरी रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करत चांडे यांच्या डाव्या हाताच्या दंडाला चावा घेऊन जखमी केले.

त्यात त्यांचा नातू राजदीप भारत चांडे मात्र बालंबाल बचावला. किसन चांडे यांना उपचारासाठी लोणी येथील पीएमटी रुग्णालयात दाखल केले असता त्यांना पुढील उपचारासाठी नगर येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.तर गळनिंब येथील मुक्ताजी जाटे व त्यांचा मुलगा सार्थक मुक्ताजी जाटे (वय १३) हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून गळनिंबकडून ममदापूर गावात जात असताना साडेआठ वाजेच्या दरम्यान चांडेवाडी – राजूरी रोडवरील स्वामी समर्थ केंद्राजवळ त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब-जाटेवस्ती येथील तेरा वर्षीय सार्थक मुक्ताजी जाटे जखमी झाला असून यात बिबट्याने सार्थकच्या पायाला जबरी चावा घेतल्याने त्याच्या पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र या हल्ल्यात मुक्ताजी जाटे हे बचावले आहेत. यावेळी सार्थकवर गावातील खाजगी रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला लोणी येथे पाठविण्यात आले होते.

या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या ऊसतोड चालू असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बिबटे सैरभैर झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे बिबट्यांनी लोकवस्तीकडे वाट धरली आहे. लहान मुलांकडे व वयस्कर माणसांकडे लक्ष ठेवावे व आपणही सुरक्षित रहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आलेले आहे. तसेच ममदापूर, चांडेवाडी, म्हसेमळा गळनिंब, जाटेवस्ती येथे पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!