Disha Shakti

राजकीय

अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंनी अखेर दिला राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला

Spread the love

दिशाशक्ती मुंबई :  गेल्या अनेक दिवसांपासून वादात अडकलेले मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे. बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी दबाव वाढवला होता. संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे याचा निकटवर्तीय असल्याचं बोललं जात होते. सोमवारी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात तीव्र संतापाची लाट उसळली होती. त्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांचा राजीनामा मुख्यमंत्र्‍यांनी घेतला आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली होती. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक झाली होती. त्यातच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. हे फोटो पाहून लोकांमध्ये संताप पसरला. आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी महायुती सरकारवर दबाव वाढला. त्यानंतर अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे राजीनामा दिलेला आहे. त्यांचा राजीनामा मी स्वीकारला असून पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवला आहे. धनंजय मुंडे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून मुक्त करण्यात आलं आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!