विशेष प्रतिनिधी पारनेर / वसंत रांधवण : तालुक्यातील आदर्श गाव टाकळीढोकेश्वर पंचक्रोशीतील सर्वधर्मियांचे श्रध्दास्थान असलेले जागृत देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्सव यावर्षी मोठ्या धुमधडाक्यात साजरा होणारा आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. टाकळी ढोकेश्वरमध्ये परिसरातील सर्वात मोठा यात्रा महोत्सव असल्यामुळे या ठिकाणी भाविकांची व पाहुणेरावळ्यांची नेहमीच गर्दी असते. सोमवार,दि.३१ मार्च पासून या यात्रा महोत्सवाला सुरुवात होते तर गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेने या यात्रेची सांगता होते.
गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी सोमवार दिनांक ३१ मार्च रोजी फकीर शहावाली बाबांचा संदल कार्यक्रम मोठ्या धुमधडाक्यात दारुगोळ्याची आतषबाजी करत यात्रेला सुरुवात होते. मंगळवार दि. १ एप्रिल रोजी बनाईदेवी यात्रेनिमित्त सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री ७.३० वा भव्य छबिना मिरवणूक आतिषबाजी आणि रात्री १० वा नामवंत तमाशा कलावंत कलाकार तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या मराठमोळ्या तमाशा कार्यक्रमाचे आयोजन केले असून बुधवार दि.२ एप्रिल रोजी मळगंगा देवीची सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक दुपारी चार वाजता कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे.
रात्री ७.३० वा भव्य पालखी छबिना मिरवणूक तर गुरुवार दि. ३ एप्रिल रोजी मुक्ताई देवीच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यतींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ८.३० वा काठी मिरवणूक रात्री ७.३० वा भव्य छबिना मिरवणूकीने या चार दिवसीय यात्रेची सांगता होते. या यात्रा उत्सवाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन बनाईदेवी यात्रा उत्सव कमिटी व टाकळी ढोकेश्वर ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
Leave a reply