Disha Shakti

इतर

बियाणे विभागाच्या रसवंतीचे आणि नर्सरीचे उद्घाटन, विद्यापीठाने विकसित केलेला रसवंतीसाठीचा फुले 15012 हा वाण वापरावा – कुलगुरू डॉ. शरद गडाख

Spread the love

राहुरी विद्यापीठ / आर. आर.जाधव : बियाणे विभागाचे बियाणे विक्री केंद्रात बियाणे व्यतिरिक्त सूक्ष्म अन्नद्रव्य, जैविक खते, विविध फळझाडांची रोपे व इतर कृषी विद्यापीठ उत्पादित निविष्ठांची विक्री सुरू होणार आहे. याव्यतिरिक्त विक्री केंद्रालगत रसवंतीगृह सुरू करण्यात येत आहे. या रसवंतीगृहामध्ये विद्यापीठाने खास उसाच्या रसासाठी विकसित केलेला फुले 15012 या वाणापासून रस तयार करून विक्रीस उपलब्ध राहणार आहे. हा रसासाठी उसाचा वाण इतर रसवंतीगृहांना सुद्धा विक्रीसाठी उपलब्ध राहील असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ आणि डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोल्याचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. 

      महात्मा फुले कृषि विद्यापीठातील बियाणे विभागाने नव्याने सुरू केलेल्या रसवंतीगृह व नर्सरीचे उद्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. विठ्ठल शिर्के, संचालक विस्तार शिक्षण डॉ. गोरक्ष ससाणे, कुलसचिव तथा प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले, नियंत्रक तथा उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. भरत पाटील व कुलगुरूंचे तांत्रिक अधिकारी डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते. 

         यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले कुलगुरूंच्या संकल्पनेतून शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी सर्व काही उपलब्ध व्हावे यासाठी विद्यापीठाच्या गेटलगत बियाणे विक्री केंद्रात विद्यापीठ उत्पादित निविष्ठा व नर्सरीतील रोपे विक्रीसाठी उपलब्ध करून देत आहोत. याचा सर्व शेतकरी वर्गाने फायदा घ्यावा. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कुलसचिव तथा प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार डॉ. कैलास गागरे यांनी मानले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Spread the love

Leave a Reply

error: Content is protected !!