श्रीरामपूर प्रतिनिधी / इनायत अत्तार : जनावरे घेऊन जाणाऱ्या एका संशयित पिकअपला पोलिस हवालदाराने ताब्यात घेतले. पिकअपमध्ये बसून वाहन पोलिस ठाण्याकडे नेण्याचे आदेश हवालदाराने दिले. मात्र, आरोपीने पोलिस ठाण्याऐवजी दुसऱ्या दिशेने पिकअप वेगाने पळविला. अखेर गतिरोधकामुळे वेग कमी झाल्याचा फायदा घेत हवालदाराने वाहनातून उडी मारत कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हवालदार आजिनाथ आंधळे यांनी याप्रकरणी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून रफिक शेख (रा. मानोरी, ता. राहुरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेलापूर रस्त्याने जनावरे घेऊन एक पिकअप येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी शहरातील सिद्धिविनायक चौक येथे सापळा रचला होता. संशयित वाहन दिसताच पोलिसांनी त्याला थांबविले. त्यावेळी पिवळ्या रंगाच्या पिकअपमध्ये जनावरे दिसून आली. आजिनाथ आंधळे हे त्या पिकअप वाहनात बसले. त्यानंतर पुढील प्रकार घडला. गोंधवणी रस्त्याजवळ एक गतिरोधक आल्याने आंधळे हे बचावले.
श्रीरामपूर येथे पोलीस हवालदारालाच घेऊन पळाला आरोपी, हवालदाराने वाहनातून उडी मारत केली स्वतःची सुटका….

0Share
Leave a reply